
बोगस इ पास काढून प्रवाशांना घेऊन येणारी आराम बस कशेडी घाटात पोलिसांनी रोखली
जिल्ह्यात ई-पास शिवाय प्रवेश नसताना जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटात रविवारी तेथील तपासणी नाक्यावर खासगी आराम बस पोलिसांनी अडवली. त्यामध्ये चोवीस प्रवासी होते. तपासणीदरम्यान ट्रान्सपोर्ट कंपनीने प्रवास तिकिटामध्ये प्रत्येक प्रवाशाकडून पाचशे रुपये जादा घेतल्याचे प्रवाशांनी सांगितले. मात्र, ई-पास बोगस असल्याचे उघड झाल्याने प्रवाशांना धक्का बसला. त्यांनी आमची फसवणूक करणार्यांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली.पोलिसांनी अडवलेल्या बसमधील सर्व प्रवाशांनी प्रशासनाला मुंबई येथून कोणत्या एजंटने पास दिले याची माहिती दिली. या तपासणीत जिल्हा प्रशासनाने मुंबई ते साखरपा-संगमेश्वर येथे जाणार्या या सर्व प्रवाशांना जिल्ह्यात प्रवेश दिला. मात्र, ज्या खासगी आरामबसने ते आले ती बस पोलिसांनी ताब्यात घेतली. त्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी धाव घेत सर्व बोगस पास ताब्यात घेऊन संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
www.konkantoday.com