निवखोल येथे मासे वाहतुकीच्या टेम्पोमधून सांडणार्या पाण्यामुळे होत आहेत अपघात
रत्नागिरी शहरालगतच्या लाला कॉम्प्लेक्स ते कर्ला रस्त्यावर मासे वाहतुकीच्या टेम्पोमधून सांडणार्या पाण्यामुळे रस्ते निसरडे होवून दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. तसेच या परिसरात दुर्गंधीही पसरत आहे. अपघाताच्या सातत्याने होणार्या घटना रोखण्यासाठी मासे वाहतूक करणार्या टेम्पोमधून होणार्या पाणी गळतीसंबधी उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
लाला कॉम्प्लेक्स व कर्ला येथे जात असताना निवखोल तीव्र उतार आहे. या मार्गावर सातत्याने मच्छी वाहतुकीचे टेम्पो ये-जा करत असतात. पूर्वी केवळ रात्रीच्या सुमारास हे टेम्पो वाहतूक करत होते. मात्र आता दिवसभर मच्छी वाहतुकीचे ट्रक ये-जा करत असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर मच्छीचे पाणी टेम्पोमधून पडत असते. तीव्र उतारात हे पाणी येत असल्याने त्यावरून दुचाकी व तीनचाकी वाहने घसरून अपघाताच्या घटना घडत आहेत. निसरडे होत चाललेल्या रस्त्यांमुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. www.konkantoday.com