कुवारबाव घनकचरा निर्मूलन प्रकल्पासाठी जागेच्या मागणीचा प्रस्ताव मंजूर करून घ्यावापालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
रत्नागिरी (प्रतिनिधी) : कुवारबाव घनकचरा निर्मूलन प्रकल्पासाठी जागेच्या मागणीचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी यांचे कडून मंजूर करून घ्यावा आणि हा घनकचरा प्रकल्प मार्गी लावावा, असे निवेदन पत्रकार कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक निवृत्त माहिती अधिकारी श्री. प्रभाकर कासेकर यांनी येथील रहिवाशांतर्फे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांना दिले. याबाबत आपण निश्चित लक्ष घालू असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
निवेदनात म्हटले आहे की, कुवारबाव ग्रामपंचायतीच्या घनकचरा निर्मूलन प्रकल्पासाठी ग्रामस्थांकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. या प्रकल्पासाठी ग्रामीण पोलीस स्थानकाच्या पाठीमागील मोकळी जागा मिळावी असा प्रस्ताव कुवारबाव ग्रामपंचायतीकडून २५ मार्च २०२३ रोजी सादर केलेला आहे. मात्र कुवारबाव ग्रामपंचायतीकडून या प्रस्तावाचा योग्य पाठपुरावा होताना दिसत नाही. परिणामी पत्रकार कॉलनी जवळ असलेल्या नाल्यात कुवारबावमधील टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याचा त्रास पत्रकार कॉलीनीला सहन करावा लागत आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे डासांचे साम्राज्य निर्माण झाले असून साथीचे आजार पसरत आहेत.
नाल्यातील सांडपाण्यामुळे परिसरातील विहिरींचे पाणी दूषित होत आहे. त्यामुळे घनकचरा निर्मूलन प्रकल्पासाठी जागेचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर स्थानिक ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
www.konkantoday.com