एक्सल कंपनीतील स्फोटाने लोटे औद्योगिक वसाहत हादरली; सुदैवाने मनुष्यहानी नाही

खेड : उत्पादन प्रक्रिया सुरु असतानाच विजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड होवून अचानक वीजदाब वाढल्याने लोटे औद्योगिक वसाहतीतील एक्सल इंडस्ट्रिज या रासायनिक कारखान्यात स्फोट झाला. या वेळी झालेल्या मोठ्या आवाजाने परिसरामध्ये घबराट पसरली. सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातात जीवीतहानी टळली असली तरी या घटनेमुळे रासायनिक कारखान्यांमधील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कंपनी व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी पहिल्या पाळीतील कामगार कंपनीच्या सॉल्व्हट रिकव्हरी प्लॅन्टमध्ये काम करत असताना प्लॅन्टमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाला आणि घर्षण झाल्याने ठिणगी पडून सॉल्व्हंटने पेट घेतला. यावेळी झालेल्या मोठ्या आवाजाने प्लॅन्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांसह आजुबाजुच्या नागरिकांमध्येही घबराट निर्माण झाली. ही घटना घडताच कंपनीच्या सेफ्टी टिमने तात्काळ हालचाल करून पेटलेल्या आगीवर ताबा मिळवला. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
आज सकाळी घडलेल्या या घटनेमध्ये सुदैवाने जीवीतहानी टळली असली तरी लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या औद्योगिक वसाहतीतमध्ये या आधीही अनेकदा अशा प्रकारचे अपघात घडले आहेत. या जीवघेण्या अपघातांमध्ये काही कामगारांचा जीव देखील गेलेला आहे. मात्र कंपनी व्यवस्थापन किंवा अशा प्रकारचे अपघात घडू नये यासाठी असलेल्या यंत्रणा योग्य ती खबरदारी घेत नसल्याने येथील कामगारांच्या मानेवर मृत्युची टांगती तलवार कायम आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीतील ज्या एक्सेल इंडस्ट्रिज या कंपनीत ही दुर्घटना घडली त्या कंपनीपासून हाकेच्या अंतरावर तळासरी वाडी, चाळके वाडी या वाड्या आहेत. या दुर्घटनेदरम्यान झालेल्या मोठ्या आवाजाने या वाड्यांमधील रहिवाशी कमालीचे घाबरून गेले. काही ग्रामस्थांनी स्फोटाचा आवाज आलेल्या कंपनीकडे धाव घेत नेमके काय घडले? याबाबत चौकशी सुरु केली. खरतर एवढी मोठी घटना घडल्यानंतर कंपनीने धोक्याचा इशारा देणारा सायरन वाजविणे गरजेचे होते. मात्र कंपनीने सायरन न वाजवल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. हलगर्जीपणा करणाऱ्या कंपनीची कसून चौकशी करून कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button