
जिल्ह्यातील 47 प्राथमिक शाळांची वीज महावितरणने खंडित केली
वीजबिल न भरल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील सहा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील 47 प्राथमिक शाळांची महावितरणकडून वीज जोडणी तोडण्यात आली आहे. वीजबिलापोटी तब्बल 4 लाख 29 हजार 270 रुपये थकीत असल्याने महावितरणने ही कारवाई केली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील 2496 जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वीज जोडणी करण्यात आलेली आहे. तर 22 शाळांना अजूनही वीज जोडणी देण्यात आलेली नाही. तसेच जिल्ह्यातील 156 शाळांनी विविध कारणामुळे वीजबिल भरणा केलेला नाही. या शाळांनी सुमारे 6-7 महिने वीजबिलच भरलेले नसल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे तब्बल 4 लाख 29 हजार 270 रुपये इतकी वीजबिलाची रक्कम थकीत आहे.
महावितरणने हे वीज बिल माफ करावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समित्यांकडून शासनाकडे करण्यात आली आहे. मात्र, महावितरणने थकीत शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम हाती घेतली आहे. आत्तापर्यंत 47 प्राथमिक शाळांची वीज महावितरणने खंडित केली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत शाळांच्या खंडित वीजपुरवठा विषयावर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान रत्नागिरी, खेड व राजापूर या तीन तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकारी यांनी गेले सहा महिने शाळांची वीज तोडल्याचा अहवालच दिलेला नसल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे या हलगर्जीपणाबद्दल शिक्षणाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून कारवाईचे संकेत मिळत आहेत
www.konkantoday.com