
नामशेष होणार्या गिधाडांच्या संवर्धनासाठी पुढचे पाऊल
राज्यात गिधाडांची संख्या वाढण्याच्यादृष्टीने तसेच त्यांचे प्रभावी संरक्षण व संवर्धन व्हावे यादृष्टीने बीएसएचएस संस्थेच्या सहकार्याने तातडीने योजना तयार करून त्यादृष्टीने कार्यवाही करावी असे निर्देश राज्य वन्यजीव मंडळाचे उपाध्यक्ष व वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी राज्य वन्यजीव मंडळाच्या झालेल्या बैठकीत वन विभागाला दिले आहेत. राज्यातील गडचिरोली आणि कोकण या दोनच भागात गिधाडे शिल्लक असून सरकारच्या या निर्णयाने कोकणातील नामशेष होत चाललेल्या गिधाडांच्या संवर्धनाची आशा व्यक्त होत आहे.
अवघ्या अर्धा तासात गिधाड मृत जनावरांचे मांस फस्त करतात. गिधाड सहसा शिकार करीत नाही. म्हणूनच त्यांना निसर्गातील स्वच्छता दूत म्हटले जाते. गिधाड पक्षी गरूडापेक्षाही मोठा व ताकदवान असतो तरीही तो शिकार न करता प्राण्यांच्या मृत शरीराची विल्हेवाट लावून पोट भरत असतो. निसर्गाची साफसफाई करणारी गिधाडे आपण वर्षानुवर्षे पाहत होतो. मात्र शेकडोंच्या संख्येने दिसणारी ही गिधाडे अचानक नाहिशी झाली.
चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग मित्र संस्था कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी व सिंधुुदुर्ग जिल्ह्यांमध्ये निसर्ग संवर्धनाचे काम करताना त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यामुळे गिधाडांचे संरक्षण व संवर्धन उपक्रम राबवण्याचा निर्णय संस्थेकडून घेण्यात आला होता. त्यानुसार सुरूवातीला गिधाडांच्या वसतिस्थानांची शोधमोहीम सुरू झाली होती. २००३ मध्ये दापोली तालुक्यात मुरूड व आंजर्ले येथे नारळांच्या झाडांवर पांढर्या पाठिच्या गिधाडांच्या दोन वसाहती आढळल्या होत्या. त्यानुसार स्थानिकांच्या सहकार्यातून संवर्धनाचे काम सुरू केले होते.
www.konkantoday.com