हवेत बंदूकीच्या तीन फैरी झाडून, अंतिम बिगुल वाजवून देशभरातील शहीद पोलीसांना अभिवादन
स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र वाहून पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून श्रद्धांजली
*रत्नागिरी, दि. 21 : देशभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पालकमंत्री उदय सामंत यांनी स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. हवेत बंदूकीच्या तीन फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून पोलीस दलाकडून शहिदांना सलामी देण्यात आली.
गेल्या वर्षभरात पोलीस दलातील ज्या पोलीस अधिकाऱ्यांना व अंमलदारांना कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झाले, त्यांच्या स्मृतीस येथील पोलीस कवायत मैदानावरील स्मृतिस्तंभास पालकमंत्री श्री. सामंत, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकणी आणि पोलीस उपअधिक्षक निलेश माईनकर यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.
पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी श्रद्धांजली संदेश वाचन केले. लडाख येथे केंद्रीय राखीव पोलीस दलातील १० शूर शिपायांवर २१ ऑक्टोबर १९५९ रोजी चीनच्या सशस्त्र सैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात पोलीसांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली व प्रतिकार करण्याचा प्रयत्न करुन सरहद्दीचे संरक्षण करताना प्राण गमावला. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ २१ ऑक्टोबर हा दिवस प्रतिवर्षी भारतभर पोलीस स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. दि. १ सप्टेंबर २०२२ ते ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत भारतामध्ये एकूण १८८ पोलीस अधिकारी व जवान यांनी कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य पत्करले. वर्षभरात अशाप्रकारे वीरगती प्राप्त झालेल्या देशातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या आत्म्यास शांती लाभो, म्हणून मी त्यांना भावपूर्ण श्रध्दाजंली अर्पण करतो.
यानंतर पोलीस दलामार्फत हवेत बंदूकीच्या तीन फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून शहिदांना सलामी देण्यात आली.
www.konkantoday.com