
पत्नीसोबत भांडण झाल्याने दारूच्या नशेत प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या, संगमेश्वर-दाभोळे येथील घटना
संगमेश्वर : तालुक्यातील दाभोळे बाजारपेठ येथे प्रौढाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत साखरपा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उदय सदाशिव हिरवे (वय-५५, रा. दाभोळे बाजारपेठ) असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. उदय हिरवे याला दारूचे व्यसन होते. तो दारूच्या नशेत बायकोला शिवीगाळ करत असे. रविवारी रात्री तो दारू पिऊन घरी आल्यानंतर त्याची पत्नी विद्या हिच्यासोबत त्याचे भांडण झाले. यानंतर घराचे दरवाजे लावून घेत घरातील लाकडी वाशाला साडीच्या सहाय्याने त्याने गळफास घेतला. त्याच्या पत्नीने दरवाजातून बघितले असता पती गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. उदयच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.