आरवली ते बावनदी टप्प्यासाठी नवीन कंत्राटदार
मुंबई-गोवा महामार्गावरील कामाच्या गेल्या १५ वर्षात कंत्राटदार बदलणे, हे एकच काम नेटाने सुरू आहे. या महामार्गावरील आरवली ते वाकेड टप्प्यातील कामासाठी पुन्हा नवीन कंत्राटदार नेमण्यात आला आहे. मात्र नवीन कंत्राटदाराचे काम हे नव्याचे ९ दिवस ठरतात की आरवली ते वाकेड या आतापर्यंतच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या टप्प्याचे काम या कंत्राटदारांकडून पूर्ण करण्यात येईल, याबाबत चर्चा रंगत आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील ७ टप्प्यांपैकी आरवली ते बावनदी या टप्प्याचे काम रोडवेज सल्युशन कंपनीच्या कंत्राटदाराकडून करण्यात येत होते. मात्र गेली अनेक वर्षे कंत्राटदारांची बिलं हा विषय जटील झाला होता. केंद्रीय रस्ते व वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः या विषयात लक्ष घालून हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. तसे राज्याचे बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनीही कंत्राटदारांचे पेमेंट व संबंधित बँकांच्या अडचणी लक्षात घेत यातून मार्ग काढण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे अनेक वर्ष प्रलंबित पेमेंट आता अदा होवू लागली आहेत. मात्र अशातच आता या आरवली ते वाकेड टप्प्यावर काम करत असलेल्या रोडवेज सल्युशन कंपनीच्या कंत्राटदाराने आपण पुढील काम करू शकत नसल्याबाबतचे पत्र बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे दिले आहे. त्यामुळे आता उर्वरित कामासाठी एचएमपीएल या कंपनीला नवीन कंत्राट देण्यात आले आहे.
www.konkantoday.com