
“धमक्या देऊ नका, तोंड बंद करणार म्हणजे काय, संपवून टाकाल का?”; सुषमा अंधारे संतापल्या
पोलिसांना सतत गुंगारा देणारा ३०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख आरोपी ललित पाटील याला कर्नाटकातून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले. अटकेनंतर त्याला मुंबईत आणण्यात आले.
यावेळी माध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाटील याने पुण्याच्या ससून रुग्णालयातून आपण पळालो नाही तर पळवले गेले. यामागे कोणाचा हात आहे, त्या सर्वांची नावे सांगणार, असा दावा केल्याने खळबळ उडाली. मात्र, ललित पाटील याच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.
ललित पाटीलला अटक केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना, सर्वांचे तोंड बंद होणार, दोषींवर योग्य कारवाई करु, असे म्हटले होते. यानंतर सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. तोंड बंद करणार म्हणजे काय करणार? संपवून टाकाल? नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना अडकवले तसे अडकवाल? देवेंद्र फडणवीस आपण एका पक्षाचे नेते नाही तर राज्याचे गृहमंत्री आहात. उडता महाराष्ट्र नाही झाला पाहिजे. जो कोणी ड्रग्जच्या विरोधात बोलेल त्यांनी शांत राहावे, अशी तुम्ही धमकी देत आहात. ललित पाटील नावाचा माणूस पळाला नाही तर मला पळवले, असे का म्हणतो याचा शोध घ्या, या शब्दांत सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला.
www.konkantoday.com