मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यात गुप्त बैठक
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. एकीकडे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून तयारी सुरु आहे.
तर दुसरीकडे राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. सुप्रीम कोर्टात आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी पार पडत आहे. सुप्रीम कोर्टाने नुकतंच आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली. कोर्टाने राहुल नार्वेकर यांना अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी तातडीने वेळापत्रक जाहीर करावं. नाहीतर आम्ही वेळापत्रक जाहीर करु, असं कोर्टाने स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे.
कोर्टाने येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत विधानसभा अध्यक्षांना शेवटची संधी दिलीय. कोर्टाने तसं म्हटलं देखील आहे. याशिवाय कोर्टाने याबाबत प्रसारमाध्यमांसमोर कोणतंही मत मांडण्यास मज्जाव केलाय. कोर्टाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना विधानसभा अध्यक्षांसोबत दसऱ्याच्या सुट्टीच्या दिवशी बसून वेळापत्रक ठरवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकर यांना आता शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणाच्या याचिकांचं वेळापत्रक जाहीर करणं बंधनकारक असणार आहे. या सर्व घडामोडींदरम्यान आज अतिशय महत्त्वाच्या हालचाली घडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्षांची गुप्त बैठक
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडलीय. एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांच्यात बंद दाराआड यावेळी चर्चा झालीय. या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी सुरक्षा रक्षकांनाही बाहेर ठेवलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
गुप्त बैठकीत चर्चा काय?
दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर राहुल नार्वेकर वर्षा निवासस्थानाबाहेर पडले. यावेळी त्यांनी पत्रकारांना मतदारसंघाच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं नार्वेकरांनी सांगितलं. पण या भेटीतलं खरं कारण हे आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरील चर्चा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पुढील पावलं काय उचलली पाहिजेत याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या गुप्त बैठकीनंतर राहुल नार्वेकर काय पावलं उचलतात ते पाहणं महत्त्वाचं असेल.
www.konkantoday.com