कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कर्नाटकच्या काही भागांतील सुमारे २८ नद्यांची उगमस्थाने धोक्यात
कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कर्नाटकच्या काही भागांतील सुमारे २८ नद्यांची उगमस्थाने धोक्यात आहेत. त्यामुळे नद्यांच्या उगमस्थानांच्या आसपास असणाऱ्या वायंगणीमधील शेतीही संपत आहे. याबरोबरच भूगर्भातील जलप्रवाहांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झालेला आहे. पश्चिम घाटातील डोंगरात अनेक नद्या उगम पावतात. पुढे त्या डोंगर, कडे-कपाऱ्या ओलांडून मैदानी प्रदेशात येतात.तेथून त्यांचा प्रवास कर्नाटक, आंध्र प्रदेश असा होत पुढे एखाद्या मोठ्या नदीला मिळून संपतो. मात्र, या नद्या दोन ते तीन राज्यांतील शेतीसह उद्योगाला पाणी पुरवठा करतात. दक्षिण भारताची पाण्याची गरज पूर्ण करण्यामध्ये या नद्यांचे मोठे योगदान आहे. नदीच्या उगमाच्या ठिकाणी भूगर्भांतर्गत पाण्याचे प्रवाह असतात. मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, नैसर्गिक भूरूपात केलेले बदल यांमुळे अंतर्गत प्रवाह कोरडे पडले असल्याचे धक्कादायक चित्र दिसते.
नदीच्या पात्रातील वायंगणी शेती केली जाते. ती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. उगमाजवळचे प्रवाह आटल्याने पुढच्या भागातील प्रवाह कोरडे पडत आहेत. मोठ्या नद्यांच्या उपनद्यांनाही हा धोका जाणवत आहे. नद्यांची उगमस्थाने धोक्यात आली असून भविष्यात हे संकट अधिक भीषण स्वरूप धारण करेल, असा कयास आहे.
www.konkantoday.com