उड्डाणपूल दुर्घटनेनंतर राष्ट्रवादी आक्रमक ईगल कंपनी, महामार्ग कार्यालयावर धडक
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहाद्दूरशेख नाका येथील उड्डाणपूल दुर्घटनेनंतर मंगळवारी येथील राष्ट्रवादी आक्रमक झाली. राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन केल्यानंतर कार्यकर्त्यांनी कामथे येथील ईगल कंपनी, महामार्ग कार्यालयावर धडक दिली. यातच महामार्ग तसेच कंपनी अधिकारी चर्चेसाठी येत नसल्याने बहाद्दूरशेखनाका येथे रास्तारोको केला. तब्बल पाऊण तास रास्तारोको झाल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. शेवटी आमदार शेखर निकम यांनीच आग्रह केल्यानंतर कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.
बहाद्दूरशेखनाका येथील नव्याने सुरू असलेला उड्डाणपूल सोमवारी दुपारी कोसळला. यात पुलाच्या पाहणीसाठी गेलेले आमदार शेखर निकम व त्यांचे सहकारी थोडक्यात वाचले. मात्र काहींना धावपळीत दुखापत झाली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी रास्तारोकोच्या माध्यमातून संताप व्यक्त केला. सकाळी साडेदहाच्या सुमारास कार्यकर्ते आमदार निकमांच्या संपर्क कार्यालयासमोर जमले. तेथे ईगल कंपनी, राष्ट्रीय महामार्गाविरोधात घोषणाबाजी करताना ठेकेदार कंपनीच्या निकृष्ट कामाचा व बेपर्वाईचा निषेध केला. तेथून संतापलेल्या राष्ट्रवादीच्या जमावाने कामथेतील ईगल कंपनी कार्यालयावर धडक दिली. www.konkantoday.com