शालेय विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन जाहीर
राज्य विज्ञान व गणित प्रशिक्षण संस्था, नागपूर यांच्यावतीने आयोजित ५१ व्या तालुका जिल्हा व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि स्पर्धांचे नियोजन नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार यावर्षीच्या प्रदर्शनासाठी समााजासाठी विज्ञान व तंत्रज्ञान हा विषय निश्चित करण्यात आला आहे. १५ ऑक्टोबर ते २५ जानेवारी या कालावधीत विविध स्तरावरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. शाळांच्या सत्रांत परीक्षा व दिवाळी सुटीचा विचार तारखा ठरवताना न झाल्यामुळे तालुका प्रदर्शनाच्या आयोजनात काही अडचणी येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज्य विज्ञान व गणित प्रशिक्षण संस्थेतर्फे प्रतिवर्षी तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीच्या ५१ व्या प्रदर्शनासाठी समाजासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या मुख्य विषयांतर्गत आरोग्य, जीवन, कृषी, दळणवळण व संगणकीय विचार हे उपविषय देण्यात आले आहेत. यामध्ये विज्ञान प्रतिकृती प्रदर्शन आणि स्पर्धेसाठी विद्यार्थी, शिक्षक व प्रयोगशाळा परिचर यांच्यासाठी विविध स्पर्धांचेही आयोजन केले जाते. तालुकास्तरीय प्रदर्शने १५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर, जिल्हास्तर १५ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर २०२३ तर राज्यस्तरीय प्रदर्शन आणि स्पर्धा ५ ते २५ जानेवारी २०२४ या कालावधीत हे आयोजन केले जाणार आहे.
www.konkantoday.com