
भक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी दुर्वास पाटीलने भक्तीचे दागिने खंडाळ्यात उकिरड्यावर फेकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न
रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे येथील भक्ती मयेकर हिचा खून केल्यानंतर दुर्वास पाटील याने तिचा मृतदेह आंबा घाट येथे फेकून दिला होता. यापूर्वी दुर्वास व त्याच्या दोघा साथीदारांनी भक्तीच्या अंगावरचे दागिने काढून घेतले. कोणताही पुरावा मागे राहू नये, यासाठी दुर्वासने खंडाळा येथील एका उकिरड्यावर हे दागिने फेकून दिल्याची माहिती आता पोलीस तपासात समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भक्तीचे दागिने दुर्वासने फेकलेल्या ठिकाणाहून जप्त केल्याचे सांगितले.
भक्ती मयेकर हिच्या खुनातील मुख्य आरोपी दुर्वास दर्शन पाटील हा अतिशय चलाख असल्याचे समोर येत आहे. भक्ती मयेकर हिचा खून केल्यानंतर दुर्वासने पुरावे नष्ट करण्याचे अतोनात प्रयत्न केले होते. १६ ऑगस्ट रोजी भक्ती मयेकर हिचा दुर्वास पाटील, विश्वास पवार व सुशांत नरळकर या तिघांनी गळा आवळून खून केला तसेच मृतदेह चारचाकी गाडीमध्ये भरून तो आंबा घाट येथून फेकून देण्यात आला. हा मृतदेह कोणाच्या हाती लागल्यास तिच्या दागिन्यांवर ओळख पटू नये, याची खबरदारी दुर्वास याने घेतली होती.
३० ऑगस्ट रोजी भक्ती मयेकर हिचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे अवघड बनले होते. मात्र भक्ती हिच्या हातावर असलेल्या टॅटूमुळे तिच्या भावाने हा मृतदेह भक्ती हिचा असल्याचे सांगितले.
www.konkantoday.com




