
जगबुडी नदीत मृतावस्थेत तरंगताना आढळली महाकाय मगर
खेड : जगबुडी नदीमध्ये शुक्रवारी दि. ४ रोजी दुपारी एक नऊ फूट लांबीची महाकाय मगर मृतावस्थेत नदीत तरंगताना आढळून आली. या मगरीचे वय अंदाजे आठ वर्ष आहे. मृत मगर नदीत तरंगत असल्याचे नागरिकांनी वन विभागाला सांगितल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या मगरीला नदीच्या काठावर आणून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत शवविच्छेदन करून नदीच्या किनारीच या मृत मगरीला जाळण्यात आले. दरम्यान खेडमधील जगबुडी नदीमध्ये मगरीच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ होत असून गेल्या काही वर्षातली ही पाचवी घटना आहे. ४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान भरतीच्या पाण्यामध्ये खेड शहरातील मच्छीमार्केट परिसरात नदीकिनाऱ्यालगत ही महाकाय मगर नदीच्या पाण्यात तरंगत असताना निदर्शनास आली. काही नागरिकांनी हे पाहिल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत दूरध्वनीहून कल्पना दिली , वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत या मगरीला जेसीबी मशीन च्या साहाय्याने काठावर काढले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जंगले यांना बोलावण्यात आले. त्याच ठिकाणी शवविच्छेदन करून पंचनामा करून नदीच्या काठावरच मगरीला जाळून टाकण्यात आले.