श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टाचे ज्येष्ठांसाठीचे विधायक उपक्रम कौतुकास्पद : ॲड. अजित वायकुळ
रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी येथील श्रीराम मंदिर संस्थेच्या वतीने, श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेले भजनी मेळावे, योगाभ्यास शिबिर, ज्येष्ठांचे वाढदिवस यासारखे उपक्रम ज्येष्ठ नागरिकांना नवी उमेद आणि नवसंजीवनी देणारे तसेच कौतुकास्पद आहेत, असे प्रशंसोद्गार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे ॲड. अजित वायकुळ यांनी येथे व्यक्त केले
श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टाचा मासिक स्नेह मेळावा दिनांक 14 ऑक्टोबर रोजी ॲड. वायकुळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्यावेळी त्यांनी विधी सेवा प्राधिकरणातर्फे ज्येष्ठांना देण्यात येणाऱ्या कायदेविषयक सहाय्य योजनांची माहिती दिली. कट्टाचे प्रमुख संयोजक श्री. अण्णा लिमये यांनी त्यांचे स्वागत केले तर सचिव सुरेंद्र घुडे यांनी कट्टाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी दलित मित्र श्री. एस बी खेडेकर यांनी रत्नागिरी शहरात भक्ती भूषण दानशूर भागोजी शेठ किर यांचा पूर्णाकृती पुतळा शासकीय खर्चाने उभारून त्यांचे कायमस्वरूपी स्मारक निर्माण करण्यात यावे, या मागणीचा ठराव मांडला आणि त्याला सर्वानुमते मान्यता देण्यात आली. श्रीराम मंदिर कट्टा तर्फे या मागणीचा शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन संयोजकांनी दिले. यावेळी डॉक्टर दिलीप पाखरे यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. यावेळी निवृत्त माहिती अधिकारी प्रभाकर कासेकर, श्री राम मंदिर संस्थेचे कोषाध्यक्ष संतोष रेडीज, श्रीमती संजीवनी जामखेडकर, श्रीमती अनुया बाम यांची प्रमुख उपस्थिती होती.
रत्नागिरी शहरात डेंग्यूची साथ वाढल्याने नगरपरिषदेने घूडेवाठार आणि अन्य भागातील गटारांची स्वच्छता करावी तसेच डास प्रतिबंधक औषध फवारणी करावी, यासाठीचे निवेदन रत्नागिरी नगर परिषदेला देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी ऑक्टोबर महिन्यात वाढदिवस असलेल्या मंगेश कोळेकर, सुधीर वायंगणकर, डी बी कुलकर्णी, प्रभाकर कासेकर, अरविंद वांदरकर, दशरथ खेडेकर, श्रीमती अनुया बाम या ज्येष्ठांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. पुढील मासिक स्नेह मेळावा शनिवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित केल्याचे जाहीर करण्यात आले.
www.konkantoday.com