
उद्धव ठाकरेंकडून 6 निष्ठावंतांना ‘प्रमोशन’,खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र वायकर, आमदार सुनील प्रभू यांची नेते पदी नियुक्ती
लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झालीये. बेरजेचं राजकारण करण्याबरोबरच पक्षाला मजबूत करण्यावर जोर दिला जात आहे. उद्धव ठाकरेंनीही मुंबई महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुंषगाने काम सुरू केलेय.
याचाच एक भाग म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला आहे. यात ठाकरेंनी सहा निष्ठावंतांचं प्रमोशन केलं आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्यांची उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित 15 ऑक्टोबर रोजी मातोश्री निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत शिवसेना कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला. कार्यकारिणीत सहा नव्या नेत्यांचा समावेश करण्यात आला. तसेच इतरही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
कोण झाले शिवसेना (उबाठा) ‘नेते’?
शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकारिणीत खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र वायकर, आमदार सुनील प्रभू यांची नेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सहा नेते वेगवेगळ्या पदावर असले, तरी त्यांना ताकद देण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे.
उपनेते पदी कुणाला संधी
नेते पदाबरोबर उपनेते पदीही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात कल्याणचे विजय साळवी, परभणीचे खासदार बंडू जाधव, कोल्हापूरचे संजय पवार, मुंबईच्या राजुल पटेल, मुंबईच्या शीतल देवरुखकर, सोलापूरचे शरद कोळी, सोलापूरच्या अस्मिता गायकवाड, नाशिकच्या शुभांगी पाटील, कोकणातील जान्हवी सावंत, साताऱ्यातील छाया शिंदे यांना पक्षात बढती देण्यात आली आहे.
राज्यात सध्या सर्वच राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत करून पक्षबांधणी सुरू केली आहे. प्रचंड मोठ्या पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरेंकडून पुन्हा पक्ष उभा करण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. त्यातच वेगवेगळ्या भागातील पदाधिकाऱ्यांना नेते आणि उपनेते पदी नियुक्त करून बळ दिलं आहे.
www.konkantoday.com