रस्ता रुंदीकरणात तोडण्यात आलेल्या वृक्षाचे पुनर्रोपण करण्याचा अभिनव उपक्रम ओ”नेस्ट गुरुकुल या शाळेने राबविला
रस्ता रुंदीकरणात तोडण्यात आलेल्या वृक्षाचे पुनर्रोपण करण्याचा अभिनव उपक्रम येथील ओ”नेस्ट गुरुकुल या शाळेने शनिवारी राबविला. वटवृक्षाचे पुनर्रोपण नारायणमळी- आंबेशेत रस्ता येथील वाडेकरवाडी येथील शाळेच्या प्रांगणात करण्यात आले.
प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. तोरल शिंदे तसेच बालरोगतज्ज्ञ डॉ. नीलेश शिंदे यांनी अनुकरणीय उपक्रम अशा शब्दात प्रशंसा करून असे उपक्रम रत्नागिरीकरांनी राबवावेत, अशी सदिच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित होते.
डॉ. तोरल शिंदे म्हणाल्या की, ओ”नेस्ट गुरुकुलने केलेला वृक्षपुनर्रोपणाचा उपक्रम अतिशय अनुकरणीय आहे. केलेल्या या कार्याचा भावी काळात या शाळेतील विद्यार्थ्यांना अभिमानच वाटेल. तोडण्यात येणाऱ्या वृक्षांना जीवदान देण्याचे कार्य आपणही प्रत्येकाने करायला हवे.
शाळेच्या संचालिका नेहा पित्रे यांनी प्रास्ताविकात या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, गुरुकुलाचे प्रतीक म्हणून वटवृक्षाची लागवड करताना रुंदीकरणासाठी तोडल्या जाणाऱ्या वृक्षाची निवड करून वृक्ष संवर्धनाचा प्रयोग केला आहे. या शाळेमध्ये मानवी नीती मूल्ये रुजवणे, समृद्ध भारतीय परंपरेची ओळख विद्यार्थ्यांना करून देऊन त्या परंपरेशी त्यांचे नाते दृढ करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून शाळेचे कामकाज चालविले जाणार आहे. प्राचीन काळी ऋषींच्या आश्रमात वटवृक्षाच्या पारावर बसून शिष्य अध्ययन करीत असत. आजही आधुनिक शिक्षण देताना निसर्गाच्या सानिध्यात आरोग्याला पोषक असणाऱ्या वटवृक्षाच्या छायेत विद्यार्थीकाही तास अध्ययन करतील. या कार्यक्रमाला शाळेचे संचालक मिथिल पित्रे, हितचिंतक आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
www.konkantoday.com