शेतकऱ्यांच्या शेती व शेतमालाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करावी-भारतीय किसान संघाची मागणी
सिंधुदुर्गनगरी- शासनाने अन्नसुरक्षा कायद्यानुसार शेतकऱ्यांच्या शेती व शेतमालाचे वन्य प्राण्यांपासून संरक्षणⁿ करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी भारतीय किसान संघाने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आज ५ हजार शेतकऱ्यांच्या स्वाक्षरींचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.
वानर, माकड, शेकरू, गवारेडा, रानडुक्कर, सांबर, हत्ती, मोर अशा विविध वन्य प्राण्यांकडून जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणावर व वारंवार नुकसान केले जात आहे. त्यामुळे शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह व अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीला कंटाळून अनेक गावातील अनेक शेतकऱ्यांनी शेती न करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बाब शासनाच्या अन्नसुरक्षा धोरणाच्या विपरीत आहे. यामुळे शेतकरी व देशाची अन्नसुरक्षा यावर बिकट संकट निर्माण झाले आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज भारतीय किसान संघाने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. यात वन्यप्राणी वनविभागाच्या हद्दीत सुरक्षित राहतील अशी आवश्यक सर्व प्रकारची उपायोजना वनविभाग व शासनाने करावी, कोकण व मुख्यतः सिंधुदुर्ग जिल्हा याचा भौगोलिकदृष्ट्या वेगळा विचार करून त्यानुसार नियमात बदल करण्यात यावेत, शेतमाल संरक्षणाचा अधिकार लक्षात घेऊन व्यक्तिगत मालकीच्या शेतीक्षेत्रात कोणताही वन्यप्राणी आल्यास त्याचा कोणत्याही प्रकारे बंदोबस्त करण्याचा सर्वाधिकार शेतकऱ्यांना देण्यात यावा. अशावेळी त्याच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाऊ नये, वानर, माकड, शेकरू, गवारेडा, सांबर, हती, मोर यासारख्या वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीची तक्रार करण्यासाठी पिक विमा योजनेच्या धरतीवर टोल फ्री क्रमांक उपलब्ध करावा. तसेच नुकसानग्रस्त शेतीचे जीपीएससारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्वरित वनविभाग व शेती विभागाने पंचनामा करावा. त्याचा होणारा सर्व खर्च वनविभाग व शासनाने करावा, आदी मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत.
www.konkantoday.com