बारटक्के इन्स्टिट्यूटला सप्रे दांपत्याकडून ५ संगणक संचांची देणगीसौ. प्राची, डॉ. राजीव सप्रे दांपत्याचा सत्कार
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या बारटक्के इन्स्टिट्यूटचे माजी समन्वयक डॉ. राजीव गजानन सप्रे व त्यांच्या पत्नी सौ. प्राची सप्रे या उभयातांनी इन्स्टिट्यूटला पाच उत्तम प्रतीच्या संगणक संचांची भेट दिली. याबद्दल संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
सौ. सप्रे यांनी वडील (कै.) बाळकृष्ण विश्वनाथ हळबे व आई (कै.) सुधा वि. हळबे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पाच अत्याधुनिक संगणक संच बारटक्के इन्स्टीट्यूटला नुकतेच भेट दिले. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता बारटक्के इन्स्टिट्यूटमध्ये सत्कार समारंभाचे आयोजन केले. र. ए. सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे यांनी डॉ. सप्रे यांनी आजवर बारटक्के इन्स्टिटयूटला विविध प्रकारे दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांचा गौरव केला. इन्स्टिटयूटच्या शालेय समितीच्या अध्यक्षा डॉ. कल्पना मेहता यांनी सौ. सप्रे यांचा सत्कार केला.
याप्रसंगी डॉ. कल्पना मेहता यांनी सप्रे दांपत्याच्या या कार्याचे कौतुक करताना अशा दानशूर व्यक्तींनी शैक्षणिक संस्थांच्या कार्याला हातभार लावणे गरजेचे आहे व त्यासाठी त्यांनी पुढे यावे, असे आवाहन केले. सप्रे यांच्या यांच्या मात्या-पित्यांकडून लाभलेल्या समृद्ध वारशाचा उल्लेख करून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सौ. सप्रे यांनी आई- वडीलांकडूनच अशा सत्कार्याची प्रेरणा मिळाल्याचे मनोगतामध्ये सांगितले. तसेच डॉ. राजीव सप्रे यांनी स्वतः दिलेली देणगी महत्वाची नसल्याचे विनयपूर्वक नमूद करून शिक्षण क्षेत्र व बारटक्के इन्स्टिट्यूट, गोगटे कॉलेज यांच्याप्रति असलेले त्यांचे भावबंध अधोरेखित केले.
समन्वयक डॉ. अतुल पित्रे यांनी देणगीदाखल मिळालेल्या या आधुनिक संगणकांमुळे बारटक्केची कॉम्प्युटर लॅब अधिक सुसज्ज झाली आहे. लवकरच तेथे आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) व मशीन लर्निंग हे आधुनिक अभ्यासक्रम सुरू करणार असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे संयोजन बारटक्के इन्स्टिट्युटचे प्रमुख अमित पालकर व सहकाऱ्यांनी केले.
www.konkantoday.com