
पावस परिसरातील बागायतदार लाखोंची बिले आल्याने आक्रमक
पावस पंचक्रोशीतील सत्तर जणांची वीज जोडणी तोडण्यात आली आहे. अनेकांना लाख ते सव्वालाख रुपयांपर्यंत बिले आली आहेत. कायदे धाब्यावर बसवून महावितरणकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप आंबा व्यावसायिक लाईक फोंडू यांनी केला आहे. अनेक बागायतदारांची वीज बिले कृषी पंपाला पूरक दरानुसार न आकारता ती सर्वसाधारण दराने काढली जात आहेत. महावितरणने कोकणवासीयांच्या संयमाची परीक्षा पाहू नये, अन्यथा उद्रेक होईल असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी पावस आंबा उत्पादक संघाचे बावा साळवी, अक्रम नाखवा, नंदू मोहिते, अमृत पोफडे, इम्रान काझी आदी आंबा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकर्यांची बाजू मांडताना लाईक फोंडू म्हणाले की ऊसाप्रमाणे आंबा, काजू, नारळ लागवडीसाठी वापरलेल्या कृषी पंपांना वीज युनिट दर आकारण्यात आले पाहिजेत. कृषी पंपाच्या विजबिलामध्ये महावितरणकडून होणार्या कारवाईबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वातावरणातील बदलांमुळे होणार्या विपरित परिणामांमधून शेतकरी बाहेर पडत आहे. त्यात महावितरणकडून त्रास दिला जात आहे.