पाणीपातळी घटली, चाऱ्याची समस्या, धुळीमुळे आरोग्य धोक्यात, पिकांची नासाडीबॉक्साईट उत्खननास मांदिवलीवासीयांचा तीव्र विरोध……
दापोली- शासनस्तरावरून मांदिवली येथे बॉक्साईट उत्खनन सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. त्याबाबतच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. गावाचे गावपण हरविणाऱ्या मांदिवली येथील प्रस्तावित बॉक्साईट उत्खननास येथील ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे.
दापोली तालुक्यातील मांदिवली गावाच्या महसुली हद्दीत १३९.०५ क्षेत्र हे बॉक्साईट खनिज उत्खनन करण्यासाठी म्हणून शासनाकडून खनिज पट्टा मंजूर करण्यात आला आहे. या मंजूर खनिज पट्ट्यातील महसुली क्षेत्रात मे हनिफा हरुण फजलानी यांचेकडून बॉक्साइट खनिज उत्खन केले जाणार आहे. उत्खनन करण्यासाठीची क्षमता वार्षिक ०.२६ दशलक्ष टन त्याचप्रमाणे २०० टन प्रति ताशी खनिज माल फोडण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे प्राप्त झाला आहे. त्यानुसार प्रदूषण मंडळाकडून याबाबतची जाहीर जनसुनावणी १८ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. ही जनसुनावणी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महाव्यवस्थापक जिल्हा उदयोग केंद्र, जिल्हा खनिकर्म अधिकारी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी अधिकान्यांच्या उपस्थितीत मांदिवली येथे घेण्यात येणार आहे.
बॉक्साईट उत्खनाने जर मांदिवली येथील नैसर्गिक साधनसमृद्धीला धोका येणार असेल आणि बॉक्साईट उखनाचे दुष्परिणाम गावाला वर्षोनुवर्ष भोगावे लागणार असतील तर या उत्खननाला आमचा विरोधच राहील. गावाच्या हितासाठी जे जे म्हणून करावे लागेल ते ते करण्यात येईल असे अशोक बाईत कुणबी समाजन्नोती संघ मुंबई शाखा, माजी अध्यक्ष यानी जाहीर केले आहे.
मांदिवली गावाची एकूणच सरचना पाहता या गावाचे वैभव खनिजाच्या उत्खननामुळे खरे तर लोप पावणार आहे. मादल हद्दीला लागूनच असलेल्या उंबरशेत, रोवले येथील खनिज तेथील लोकांना उत्खननाचे भोगावे लागत असलेले दुष्परिणाम हे सर्वांच्या डोळ्यासमोर आहेत. यामध्ये पाण्याची पातळी खोलवर जाणे अथवा पाण्याच्या स्रोताच्या प्रवाहाची दिशा बदलल्याने पाणी समस्येसारखी गंभीर समस्या निर्माण होणे, गुरांच्या चात्याचा प्रश्न निर्माण होणे, वन्य प्राण्यांचा अधिवासाचा प्रश्न निर्माण होणे, लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या आंबा, काजू फळ लागवडीसह भात, नागली पिकावर धुळीच्या साम्राज्यामुळे पिकावर होणारे परिणाम आणि त्यामुळे घटलेले उत्पन्न पाहता मांदिवली येथील रहिवाशांमध्ये एकप्रकारची भीती निर्माण झाली आहे. उत्खनन करणारे हे आपल्या कामापुरते गोड बोलून जातात, अशिक्षित लोकांना भुरळ पाडतात आणि काम होईपर्यंत काहीतरी लाभाचे आमिष दाखवतात, मात्र आपले काम झाले की पाठ फिरवतात असाच प्रकार रोवले आणि उंबरशेमध्ये झाला आहे. उत्खनन केलेले महाकाय खोलीचे खड्डे तसेच ठेवले गेले आहेत की जे धोक्याचे आहेत. झाडांची लागवड केली जाईल असे सांगण्यात आले होते, मात्र अद्यापही लागवड झाल्याचे दिसत नाही. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या धुळीवर पाणी मारणार असे सांगितले जाते, मात्र तो प्रक्रीया केवळ सरकारी अधिकारी येतात तेव्हाच केली जाते. अन्य वेळी पाणी मारले जात नाही ही सरकारी अधिकायांच्या डोळ्यातील धूळफेक त्यांना दिसत नाही. बिगर पासिंग अवजड वाहने भरघाव वेगाने हाकली जातात की ज्यामुळे अनेकदा अपघाताचे प्रसंग घडले आहेत. त्यामुळे रहिवाशांना धोक्याचा वाटणारा बॉक्साईट खनिज उत्खननासारखा हा धोक्याचा प्रकल्प मांदिवलीत होता कामा नये अशी येथील ग्रामस्थांची ठाम भूमिका असून याविरोधात मांदिवली ग्रामस्थ एकवटले आहेत. त्याला मांदिवली ११ गाव कुणबी सेवा संघाने जाहीर , पाठिंबा दिला आहे.
www.konkantoday.com