
खोल समुद्रात वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने मच्छीमारीला ब्रेक
मुसळधार पावसाबरोबरच वेगवान वारे वाहत असल्यामुळे मच्छीमारीला ब्रेक लागला आहे. शुक्रवारी सायंकाळी हर्णे बंदरातील दोनशे मच्छीमारी नौका जयगड, रत्नागिरीसह देवगड किनाऱ्यावर आसरा घेण्यासाठी दाखल झाल्या होत्या जयगड येथे मुंबईसह परजिल्ह्यातील काही नौका आल्या आहेत. खोल समुद्रात पाण्याला प्रचंड करंट असल्यामुळे धोका पत्करण्यापेक्षा मच्छीमारांनी बंदरावर येणे पसंत केले आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे त्याचे परिणाम अरबी समुद्रातही जाणवत आहेत. खोल समुद्रात वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. समुद्र खवळल्याने मासेमारी करणे अशक्य आहे. किनारी भागात वाऱ्याचा वेग अधिक असल्याने एकावर एक मोठ्या लाटा आदळत आहेत. बिघडलेल्या वातावरणाचा तडाखा मासेमारीला बसला आहे. पर्ससिननेट मासेमारी सुरु होऊन आठच दिवस झाले असतानाच सुरवातीलाच ब्रेक घ्यावा लागला आहे. ट्रॉलिंगसह गिलनेटच्या नौकांही बंदरातच उभ्या आहेत. पाण्याचा प्रचंड करंट असल्यामुळे मासे पकडण्यासाठी जाळी टाकणे अशक्य आहे. लाटांमुळे नौका पाण्याच्या लाटांवर हलत असल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यताही टाळण्यासाठी मच्छीमारांनी सुरक्षित बंदरावर नांगर टाकला आहे. हर्णे येथील 200 नौकांपैकी शंभर नौकांनी जयगड बंदरावर, रत्नागिरीत 50 तर देवगड (जि. सिंधुदुर्ग) येथे 50 नौका उभ्या राहिल्या होत्या
www.konkantoday.com