महाराष्ट्र आता थांबणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडक्या बहिणींचा देय हप्ता अधिवेशनानंतर जमा होणार, शेतकऱ्यांना वीज बील नाही.

नागपूर, :- राज्यातील शेतकरी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकाला दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. शासनाच्या सुरु असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिला. राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा देय हप्ता अधिवेशन संपल्यावर देण्यात येईल, अशी ग्वाही देत महाराष्ट्र कालही नंबर एक होता, आजही नंबर एक आहे आणि उद्याही नंबर एकच राहील, महाराष्ट्राशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिमानाने व आत्मविश्वासाने विधानसभेत स्पष्ट केले.नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात 1 जुलै 2022 पासून 3 लाख 48 हजार 70 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून यामुळे 2 लाख 13 हजार 267 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यात 10 मोठ्या प्रकल्पांना आपण मंजूरी दिली असून यामध्ये 2 लाख 39 हजार 117 कोटींची गुंतवणूक तर 79 हजार 720 इतकी रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. विदर्भातील 47 मोठ्या प्रकल्पात 1 लाख 23 हजार 931 कोटींची गुंतवणूक होऊन 61 हजार रोजगार निर्मिती, मराठवाड्यात 38 प्रकल्पात 74 हजार 646 कोटी गुंतवणूक व 41 हजार 325 रोजगार निर्मिती आणि उर्वरित महाराष्ट्रात 136 प्रकल्पात 1 लाख 49 हजार 493 कोटींची गुंतवणूक होऊन 1 लाख 10 हजार 588 रोजगार निर्मिती होत आहे.

यामुळे महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आहे. छ. संभाजीनगर, जालना या ठिकाणी देखील उद्योगाचे जाळे विकसित होत आहे. राज्यात वसुलीबाजांना थारा दिला नाही तर राज्याच्या प्रगतीचा वेग दुप्पट होईल. अशा वसुलीबाजांवर आता कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. त्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा संविधानानुसार दिला. यामुळे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी निधी मिळणार आहे. तसेच विद्वानांना दोन पुरस्कार मिळणार आहेत. प्राचिन ग्रंथांचा अनुवाद करण्यात येणार आहे. या सर्व प्रयत्नांसह आपण आपली भाषा रूजविणार आहोत. आता न्यायालयाती निवाडे मराठीत उपलब्ध करण्यास सुरूवात होणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी गेल्या अडिच वर्षात 167 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून यामुळे 25.21 लक्ष हेक्टर जमिन सिंचनाखील येणार आहे. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प आम्ही केला असून नदीजोड प्रकल्प, जलयुक्त शिवार योजना आणि जलसिंचन प्रकल्प यासाठी उपयुक्त आहे. वैनगंगा-नळगंगा, नारपार-गिरणा, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे असे नदी जोडप्रकल्प मार्गी लावणार असल्याने विकासाला गती मिळणार आहे. राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी, शेतकऱ्यांच्या पिकाला मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नदीजोड प्रकल्प महत्वाचे आहेत. यासाठी राज्य शासनाने जल आराखडा तयार केला आहे. राज्यात बांबू लागवडीला प्रोत्साहत देण्यात असून यामुळे देखील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

मुंबई, नागपूर, पुणे या शहरांमध्ये मेट्रोच्या कामाला अधिक गती देण्यात आली आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. मुंबईत मेट्रो टप्पा ३ चे काम अंतिम टप्प्यात असून बीकेसी ते कुलाबा ही नवीन लाईफ लाईन होणार आहे. 17 लाख प्रवाशी प्रवास करणार आहेत. मे २०२५ पर्यंत ही लाईन खुली होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.*शेतकऱ्यांकडून वीज बील घेणार नाही*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात १६ हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प सुरू केले आहेत. आतापर्यंत ६६७ मेगावॅट वीज कार्यान्वित झाली. २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॅट वीज कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करणार आहे.

शेतकऱ्यांकडून विजेचे बिल घेणार नाही. ९ लाख कृषीपंप आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. मागेल त्याला सौरपंप आम्ही देणार असून ३ महिन्यात कनेक्शन देऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 2030 साली राज्यात 52 टक्के उर्जा अपारंपरिक स्रोतातील असेल असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पालघर येथे ७६ हजार कोटी रुपये खर्च करून वाढवण बंदर करण्यात येत आहे. हे बंदर जेएनपीटीपेक्षा तीन पट मोठं असून वाढवण बंदरामुळे अनेक फायदे होणार. राज्याच्या देशाच्या विकासात वाढवण बंदरचे मोठे योगदान राहणार असून यामुळे अर्थव्यवस्थेला अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नाशिक येथे आय टी पार्क विकसित करण्यात असून या कामासाठी वास्तू विषारदाची नेमणूक झाली आहे. लवकरच येथे अद्ययावतआयटी पार्क निर्माण केला जाईल.मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील जनतेने मोठ्या आत्मविश्वासाने जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करून राज्याला विकासात प्रथम क्रमाकांवर कायम ठेवूया.विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या विकासाची दिशा आणि दृष्टीकोन स्पष्ट करताना सरकारच्या पुढील वाटचालीबाबत मनोदय अशा ओळीतून आपली भूमिकाच मांडली…या ओळी पुढीलप्रमाणे…*

महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प सोबत राहू एकदिलाने, घडवू महाराष्ट्र पुन्हा नव्याने, समृद्धीचा वेग कुणी रोखणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही…उद्योग, गुंतवणूक येतेय जोमात बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ तरुणाईचं स्वप्न कधी भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही…रस्ते, पूल, रेल्वेचे धागे, सुखदायी प्रवासाचे स्वप्न होईल जागे, गतीला स्थगिती मिळणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही…विकासाच्या स्वप्नांसोबत सेतू अटल मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल मराठी माणसाचे स्वप्न भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही…जलयुक्त शिवार देईल नवजीवन, नदीजोड प्रकल्प फुलवतील नंदनवन राज्यात दुष्काळ कुठे दिसणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही…पाणंद रस्त्यांनी जोडू शेतशिवार आनंदाचा शिधा देईल आधार उपाशी पोटी कुणी झोपणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही…लाडक्या बहिणींना मिळाला स्वाभिमान ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान लाडक्या लेकी कधी दुःखी होणार नाही अन् महाराष्ट्र आता थांबणार नाही…असेल विरोधकांचे कमी संख्याबळ, सारे टिकवून ठेऊ लोकशाहीचे बळ कोणत्याही आमदाराचा मानसन्मान घटणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही…*- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button