मुंबईतील बँक ऑफ इंडियाचा अधिकारी असल्याचे तरूणाची पावणेसात लाखांची फसवणूक
मुंबईतील बँक ऑफ इंडियाचा अधिकारी असल्याचे भासवून येथील तरूणाची ६ लाख ७५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. याप्र्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँक ऑफ इंडिया, चेक सर्व्हिस विभाग, मुंबई येथील सौरभ शर्मा व बँक ऑफ इंडियाचा कस्टमर केअर प्रतिनिधी म्हणून कामकाज करणारा अनोळखी अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना शनिवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली.
सुनिल लक्ष्मण घवाळे (३६, रा. रहाटाघर, रत्नागिरी, मूळ कळंबट, घवाळीवाडी, सावर्डे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) यांनी कामकाजासाठी बँक ऑफ इंडिया शाखा रामपूर या बँकेचा संपर्क क्रमांक गुगलवर सर्च करून तेथे उपलब्ध असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता समोरील व्यक्तीने वरिष्ठ संपर्क साधतील असे सांगितले. त्यानंतर सौरभ शर्मा नामक व्यक्तीने घवाळे व त्यांची पत्नीशी संपर्क साधून आपण बँक ऑफ इंडियाचे अधिकारी असल्याचे भासवून अवालडेक्स ऍप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करण्यास भाग पाडून त्यांना एटीएममध्ये जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी सुनिल घवाळे हे एटीएममध्ये गेल्यानंतर संशयित शर्मा याने ऑनलाईन बँकींग हा पर्याय निवडण्यास घवाळे यांना सांगितले. त्याने सांगितलेले दहा अंकी दोन कन्फरमेशन कोड त्यामध्ये नमुद केले असता फिर्यादी सुनिल घवाळे यांच्या बँक खात्यामधून दोन ट्रान्झेक्शनद्वारे एकूण ६ लाख ७५ हजार रूपये काढून घवाळे यांची फसवणूक केली. या प्रकरणी घवाळे यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित सौरभ शर्मा व कस्टमर केअर प्रतिनिधी यांच्याविरूद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सायबर पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे. www.konkantoday.com