गाय जागेत येऊन बसल्याने कुवारबाव येथे एका व्यक्तीने तिच्यापाठीत व पायावर अमानुषपणे कुदळीने घाव घातल्याची घटना


गाय जागेत येऊन बसल्याने कुवारबाव येथे एका व्यक्तीने तिच्यापाठीत व पायावर अमानुषपणे कुदळीने घाव घातल्याची घटना सोमवारी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास कुवारबाव बसथांब्यासमोर घडली.सोमवारी दुपारी कुवारबाव बसथांब्यासमोर एक गाय अनिल वाडकर यांच्या जागेत येऊन बसली होती. यावेळी वाडकर यांनी या गायीला तेथून हाकलण्याऐवजी तिच्या पाठीत टोकदार कुदळीने घाव घातला. ही कुदळ गाईच्या पाठीत मणक्याजवळ घुसल्याने मोठी जखम झाली. याचवेळी तिच्या पायाजवळही कुदळीने वार केले. त्यामुळे मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव होत होता. ही घटना घडताना, तीनचार व्यक्तींनी वाडकर यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्याच अंगावर ओरडून धमकी दिली. याप्रकारामुळे जमाव गोळा होऊ लागला. याठिकाणी तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर तातडीने काही लोकांनी शहर पोलिसांना याची माहिती दिली. जमाव जमल्यानंतर अनिल वाडकर हा आपल्या घरात जाऊन कडी लावून बसले. अनेकांनी त्यांना बाहेर बोलवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो बाहेर आला नाही. दरम्यान, विभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी, शहर पोलीस निरीक्षक शैलेश सणस, रत्नागिरी ग्रामीणचे निरीक्षक जगताप यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी जमलेल्या जमावाला शांत केले. संबंधित व्यक्तीला घरातून बाहेर बोलावून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

या जखमी गायीला एका गोशाळेत नेऊन उपचार सुरु केले आहेत. शहरातील काही पशुतज्ज्ञांनी येऊन उपचार केले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि शांततेचे आवाहन केले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button