
चिपळुणात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा आकस्मिक मृत्यू
चिपळूण तालुक्यातील दहिवली बुद्रुक निमेवाडी येथे प्रौढाचा मृतदेह त्याच्या घरी कुजलेल्या स्थितीत आढळून आल्याची घटना सोमवार, ७ एप्रिल रोजी उघडकीस आली. या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अजय महादेव कदम (५५, दहिवली बुद्रुक) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय कदम यांच्या घराशेजारी एका व्यक्तीची आंबा-काजूची बाग आहे. या बागेत ती व्यक्ती गेली असता त्यांना कदम यांच्या घरातून कुजल्याची दुर्गंधी आली.
या बाबत त्यांनी पोलीस पाटलांना माहिती दिली. घराचा दरवाजा उघडून पाहिल्यानंतर कदम यांचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. दुसर्या घटनेत सावर्डे येथे नागेश हिरू जड्याळ (५२, कोसबी) यांचाही सोमवारी मृत्यू झाला. नागेश जड्याळ यांना दारुचे व्यसन होते. सावर्डे येथील सहाणेवर बेशुद्धावस्थेत पडलेल्या स्थितीत आढळले. त्यांना उपचारासाठी सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.www.konkantoday.com