बांगलादेशातून भारतात घुसखोरी करून आलेल्या तिघांना चिपळूण शहरानजीकच्या खेर्डी येथून ताब्यात घेतले
बांगलादेशातून भारतात घुसखोरी करून आलेल्या तिघांना चिपळूण शहरानजीकच्या खेर्डी येथून ताब्यात घेण्यात आले. काही महिने ते तेथे वास्तव्यास होते. त्यांच्यावर रत्नागिरीतील दहशतवादविरोधी पथकाने कारवाई करून बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.
या तिघांकडून काही कागदपत्रे हस्तगत केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता ६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. गुल्लू हुसेन मुल्ला (५६), जिलानी गुल्लू मुल्ला (२६), जॉनी गुल्लू मुल्ला (२९, तिघेही बांगलादेश) अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून मोबाईल, आधारकार्ड, पॅनकार्ड व निवडणूक ओळखपत्र अशी कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. बांगलादेशहून भारतात अवैधरित्या प्रवेश करून मुलकी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय खेर्डी मोहल्ला परिसरात ते काही महिन्यांपासून वास्तव्य करत होते. याविषयीची रत्नागिरी दहशतवादविरोधी पथकाला माहिती मिळताच त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने मंगळवारी (ता. ३) रात्री १०.३० वा. कारवाई करून तिघांनाही ताब्यात घेतले.
www.konkantoday.com