तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डी. जे. वाजवल्याशिवाय राहणार नाही’-मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांचा शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंना इशारा
राज्यात एकीकडे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकमेकांविरोधात उभे ठाकले असताना दुसरीकडे मनसेनं मराठीसह इतर मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना टोला लगावला होता.आता त्यावरून मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘शिल्लक सेनाप्रमुख आजकाल आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आपण नैराश्यात आहात’, असा टोलाही शालिनी ठाकरेंनी लगावला आहे.
गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजेच्या दणदणाटावर टीका करताना त्यावर राज ठाकरेंनी आक्षेप घेतला होता. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवर पोस्टही लिहिली होती. त्यावरून सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला होता. ‘एखाद्या बड्या नेत्याच्या नातवाला याचा त्रास होत असेल. मुंबईच्या मुख्य रस्त्यावरून मिरवणूक जात असेल तर हा मोठा नेता वक्तव्य करेल. फक्त दुपारी उठून कसं चालेल? यावर बोललं पाहिजे’, असं सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या.दरम्यान, सुषमा अंधारेंच्या या टीकेला शालिनी ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘अंधारेबाई, यापुढे याद राखा. संबंध नसताना जर राज साहेबांच्या नातवाला आपण राजकारणासाठी बोललात, तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना तुमच्या कानाजवळ डी. जे. वाजवल्याशिवाय राहणार नाही’, अशी पोस्ट शालिनी ठाकरेंनी एक्सवर (ट्विटर) केली आहे. यासोबत शालिनी ठाकरेंनी मनसेचं एक जाहीर पत्रच शेअर केलं आहे.शालिनी ठाकरेंनी आपल्या पत्रात सुषमा अंधारेंच्या टीकेचा समाचार घेतला आहे. ‘काही हिंदू सणांमध्ये डी. जे. व लेझर लाईटमुळे होणारा त्रास याबाबत रोखठोक भूमिका घेऊन राज ठाकरेंनी त्याला विरोध केला. महाराष्ट्रातील जनतेनं, सर्वपक्षीय संवेदनशील व्यक्तींनी त्याचं स्वागत केलं. पण हेच तुम्हाला बहुधा रुचलं नसावं. राज ठाकरेंवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा तुम्ही केविलवाणा प्रयत्न करत आहात. कुटुंबाला राजकारणात ओढण्याची तुमच्या गटप्रमुखांची सवय तशी जुनीच मग तुमच्यासारखे चेले-चपाटे मागे कसे राहतील?’ असा खोचक सवाल शालिनी ठाकरेंनी पत्रातून केला आहे.
www.konkantoday.com