
वानरांचा बंदोबस्त व्हावा व भयमुक्त शेती करता यावी या मागणीकरिता अविनाश काळे यांचे उपोषण
रत्नागिरी, – कोकणात सर्व शेतकऱ्यांना त्रासदायक ठरलेल्या वानर, माकडांचा कायमचा बंदोबस्त हवा, या मागणीकडे राज्यकर्त्यांसह प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे कोकणातील हजारो शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. वानरांचा बंदोबस्त व्हावा व भयमुक्त शेती करता यावी या मागणीकरिता गुरूवारपासून (ता. ५) शेतकरी अविनाश काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषणाला बसण्याचे ठरवले आहे. सरकारने वस्तुस्थितीचा गांभीर्याने विचार करून न्याय द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे
यापूर्वी काळे यांनी या मागणीसाठी एकदिवशीय लाक्षणिक उपोषण केले होते. त्या वेळी शेतकऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळाला होता. कोकणातून सर्व जिल्ह्यांतून शेतकऱ्यांनी पाठबळ दिले होते. त्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एक महत्वाची सभा रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात घेण्यात आली होती. त्यालाही शेतकऱ्यांची चांगली उपस्थिती होती. त्यानंतर जिल्हा प्रशासन, वनविभाग यांना प्रत्येक शेतकऱ्याने निवेदन दिले होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वनमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, परिक्षेत्र वनाधिकारी या सर्वांना वानरांच्या बंदोबस्तासंदर्भात निवेदन पाठवली आहेत; मात्र अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे काळे यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
www.konkantoday.com