
गणपती सणाला येणार्या चाकरमान्यांची काळजी कोकण रेल्वे घेणार
गणपती उत्सवासाठी कोकणात मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या चाकरमान्यांची सर्वप्रकारची काळजी घेण्यासाठी कोकण रेल्वे महामंडळ सज्ज झाले आहे.कोकणात येणार्या गणेशभक्तांची सोय व्हावी यासाठी कोकण रेल्वेने जादा गाड्या व वाढीव डब्यांची सुविधा या आधीच उपलब्ध करून दिली आहे. यामुळे कोकण रेल्वेने जास्तीत जास्त प्रवासी येऊ शकणार आहेत. कोकण रेल्वेतून प्रवास करणार्या प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी कोकण रेल्वेची नेहमीची सुरक्षा यंत्रणा राहणार आहे.त्याच्या जोडीला स्पेशल फोर्सची एक तुकडीही ठेवण्यात येणार आहे. तिकिटासाठी जादा खिडक्याही उपलब्ध करून देण्यात येत आहेत.कोकण रेल्वेच्या गाड्यांना या काळात होणारी वाढीव गर्दी लक्षात घेऊन खाद्यपदार्थ व पाण्याची पुरेशी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.अनेक वेळा रेल्वेमध्ये लहान मुलांच्या खाण्याची सुविधा उपलब्ध होत नाही त्यांच्यासाठीही पुरेसे खाद्यपदार्थ रेल्वे स्थानकावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नात आहे. तशा सूचना संबंधितांना कोकण रेल्वेने दिल्या आहेत. रेल्वे प्रवास करताना काही वेळेला प्रवाशांना आरोग्याची समस्या निर्माण होते यासाठी कोकण रेल्वेने प्रवास करणार्या प्रवाशांसाठी चिपळूण व रत्नागिरी येथे चोवीस तास आरोग्य केंद्रे उपलब्ध करून देण्यात येत आहे. या केंद्राबरोबरच खेड, कणकवली, कुडाळ येथे प्रथमोपचार केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तातडीची गरज बसल्यास ते ट्विटरच्या माध्यमातून संपर्क साधू शकतात याशिवाय १८२च्या हेल्पलाइनचा ही ते उपयोग करून घेऊ शकतात.एकूणच कोकण रेल्वे चाकरमान्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे.
www.konkantoday.com