नांदेड शासकीय रुग्णालयात पुन्हा 7 जणांचा मृत्यू, 4 बालकांचा समावेश; अशोक चव्हाणांकडून ट्वीट
नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी समोर आली अन् राज्यभरात खळबळ उडाली. मात्र, या रुग्णालयात मृत्यूचं तांडव सुरुच असून, पुन्हा 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये 4 बालकांचा देखील समावेश असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, आरोग्य विभागाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत अशोक चव्हाण यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “नांदेडमध्ये मृत्यूचे थैमान सुरूच. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी 7 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू. मृतकांमध्ये 4 बालकांचाही समावेश. राज्य सरकारने जबाबदारी निश्चित करावी,” असे चव्हाण म्हणाले आहेत. तर, याबाबत प्रतिक्रिया देतांना अशोक चव्हाण म्हणाले की, “मला माहिती मिळताच मी कालच रुग्णालयात जाऊन आलो आहे. तेथील परिस्थिती अतिशय गंभीर असून, धक्कादायक आहे. ज्या काही घटना घडत आहे, त्यावर अजूनही नियंत्रण आलेलं नाही. काल 24 लोकांचा मृत्यू झाला होता, आज पुन्हा रात्रभरात 7 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे 31 लोकांचा मृत्यू झाला असल्याचे आतापर्यंत समोर येत असल्याचे,” अशोक चव्हाण म्हणाले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू. मृतकांमध्ये ४ बालकांचाही समावेश. राज्य सरकारने जबाबदारी निश्चित करावी.
सरकारवर टीका…
कोरोना काळात आम्ही ज्याप्रमाणे युद्धपातळीवर कामे केले, त्याचं प्रमाणे युद्धपातळीवर काम करणे गरजेचे आहे. तसेच, डॉक्टर नसल्यास खाजगी डॉक्टर पाचारण करणे, तत्काळ औषधांचा पुरवठा करणे, अनेक रिक्त जागा भरणे, कॉलेजमध्ये कायमचे डीन नाही,रुग्णालयात प्रचंड अस्वच्छता असून त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या सर्व वाईट अवस्थेत रुग्णालयातील डीनचा पदभार इतर डॉक्टरकडे देण्यात आला आहे. सगळ्या गोष्टीसाठी पैसा आहे, कोट्यवधी रुपयांची घोषणा केली जात आहे. मात्र, रुग्णालयासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत का? असे म्हणत अशोक चव्हाण यांनी सरकारवर टीका केली आहे.
www.konkantoday.com