वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांचे एकत्रिकरण करून समूहशाळा सुरू करण्याची योजना शिक्षण विभागाने निश्चित केल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील २४४६ शाळांपैकी तब्बल १३९२ शाळा बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर शाळेतील अडीच हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत.
राज्यातील वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करा आणि त्यातील विद्यार्थ्यांसाठी समूह शाळा सुरू करण्याचे प्रस्ताव १५ ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. या निर्णयाचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १३९२ शाळा बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात १ ते १० पटसंख्या असलेल्या ७१३ शाळा आहेत. त्यामध्ये खेड तालुक्यातील सर्वाधिक १५५ शाळांमध्ये पटसंख्या १० पेक्षा कमी आहे. चिपळूणमध्ये ८९ शाळा, दापोलीत ८७ शाळा, गुहागरमध्ये ४५ शाळा, मंडणगडमध्ये ६२ शाळा, लांजामध्ये ४९ शाळा, राजापूरमध्ये १११ शाळा आणि संगमेश्वरमध्ये १०४ शाळांमध्ये १० पेक्षा कमी पटसंख्या आहे.
वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ६७९ शाळा आहेत. चिपळुणात ८२ शाळा, दापोलीत ७६ शाळा, गुहागरात ५३ शाळा, खेडमध्ये ९५ शाळा, मंडणगडमध्ये ४० शाळा, लांजा ६९ शाळा, राजापूरात १७ शाळा, रत्नागिरीत ७९ शाळा आणि संगमेश्वरमध्ये ९४ शाळांमध्ये वीसपेक्षा कमी पटसंख्या आहे. www.konkantoday.com