मुंबई गोवा महामार्गावरील कशेडीतील सुस्साट प्रवासाला ब्रेक; येत्या चार दिवसात बोगद्यातील वाहतूक बंद होणार
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड (आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्याच्या कामाला गती देण्यात येणार आहे.
यासाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग आगामी चार ते पाच दिवसांमध्ये बोगद्यातील वाहतूक बंद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्यातून गणेशोत्सवासाठी सुरू करण्यात आली होती. या बोगद्यातून एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू होती. त्यामुळे कोकणवासियांना मोठा फायदा झाला होता.
गणेशोत्सवाच्या काळात कशेडी घाटातून एकेरी मार्गिकेवरून वाहतूक सुरू असल्याने कोकणात जाणाऱ्यांना दिलासा मिळाला होता. आता या बोगद्यातून वाहतूक चार ते पाच दिवसात बंद करण्यात येणार आहे. या बोगद्याच्या उर्वरित कामाला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जानेवारी 2024 पर्यंत कशेडी बोगदा आणि त्यापर्यंत पोहोचण्याच्या दोन्ही मार्गिका पूर्ण करून तेथून वाहतूक सुरू करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग प्रयत्न करत असल्याचे अभियंता पंकज गोसावी यांनी सांगितले.
नव्या बोगद्यामुळे कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करता येत होते. हे अंतर पार करण्यासाठी घाटातील अवघड वळणांमुळे जवळपास 20 ते 25 मिनिटांचा कालावधी लागत होता. आता कशेडी बोगद्याचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी येत्या काही दिवसात बोगदा वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात धोकादायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कशेडी घाटात नेहमीच अपघात होत असतात. मुंबई गोवा महामार्गानं सिंधुदुर्गात जातान कशेडी घाट हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. सिंधुदुर्गात जाणा-या चाकरमान्यांसाठी हा इंटरव्हल आहे. पनवेल पासून 150 किमीचा टप्पा या घाटात पूर्ण होतो. हा घाट उतरलो की, रत्नागिरी जिल्हा सुरू होतो. नागमोडी वळणांचा डोंगराळ भाग आणि त्यातून चौपदरी महामार्ग उभारताना बरीच आव्हानं होती.
मागील काही वर्ष मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यातच डिसेंबर 2024 ही शेवटची डेडलाईन चौपदरीकरण पूर्ण करण्याची असून कंपनी ठेकेदार आणि संबंधित प्रशासन दिवस रात्र काम करून या मार्गावरील चौपदरीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्नशील आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती वळणवळणाच्या घाटातून प्रवास करण्यापेक्षा या बोगद्यातून चाकरमान्यांचा सुखकर प्रवास कोकणात व्हावा यासाठी या बोगद्यातील रस्त्यावरील काँक्रेटीकरण करण्यात येऊन एक मार्गिका सुरू करण्यात आली होती.
www.konkantoday.com