
कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत समाविष्ट करणे आवश्यक- खासदार विनायक राऊत
कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत समाविष्ट करुन कोकण रेल्वे स्वतंत्र झोन केला तरच केंद्रीय बजेटमध्ये स्वतंत्र आर्थिक तरतूद करून पायाभूत सुविधांची निर्मिती होवू शकते.सध्या कोकण रेल्वेला पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी अंदाजे ३५ हजार कोटी रुपयांची गरज आहे. पण तेवढा निधी कोकण रेल्वे महामंडळाकडे नाही, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. भारतीय रेल्वेच्या नऊ विभागामध्ये दहावा विभाग कोकण रेल्वेचा स्वतंत्र कोकण झोन असा करण्यात यावा आणि भारतीय रेल्वेकडून कोकण रेल्वेला विविध सुविधा पुरविण्यात याव्या, अशी मागणी आपण केली असून यामुळे कोकण रेल्वेचे दुपदरीकरणही शीघ्र गतीने होऊ शकते, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, कोकण रेल्वे मार्गावर पायाभूत सुविधांची निर्मिती व्हावी. कोकणातील प्रवाशांना नव्या रेल्वे गाड्या मिळाव्यात. रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती व्हावी, अशा विविध मागण्या आहेत. मात्र कोकण रेल्वे महामंडळ भारतीय रेल्वेत जोपर्यंत विलीन होत नाही, तोवर प्रवाशांची गैरसोय होत राहील, असे राऊत यांनी सांगितले.
गोवा आणि कर्नाटक राज्याने कोकण रेल्वे महामंडळ भारतीय रेल्वेत विलीनीकरणाची गरज व्यक्त केली आहे.
www.konkantoday.com