‘स्वच्छता ही सेवा’ जिल्हाधिकारी, एसपी, सीईओंसह अधिकारी, कर्मचाऱ्यांचे श्रमदानजिल्ह्यात सर्वत्र कार्यालयांची स्वच्छतारविवारी पुन्हा ‘एक तारीख, एक तास’ निमित्ताने शहर परिसराची स्वच्छता


*रत्नागिरी, :- वेळ सकाळी 7 ची.. स्थळ जिल्हाधिकारी कार्यालयातील 100 फुटी ध्वजस्तंभ.. प्रत्येकाच्या हातात झाडू..प्लास्टीकच्या बाटल्या, कागद, कपटे, अनावश्यक वाढलेली झाडे.. बघता बघता कचऱ्याचा ढिग जमू लागला.. प्रत्येकजण झपाटल्यासारखा साफसफाई करत होता. यामध्ये जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, परिविक्षाधीन आयएएस अधिकारी डॉ. जस्मिन, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, प्रांताधिकारी जीवन देसाई, प्रांताधिकारी विजय सूर्यवंशी यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. औचित्य होते स्वच्छता पंधरवडा, महात्मा गांधी जयंती निमित्ताने ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्ग कार्यालयीन स्वच्छतेचे..उद्या रविवारी पुन्हा ‘एक तारीख, एक तास’ निमित्ताने शहर परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे.
आज अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या श्रमदानातून जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली. यात महिला अधिकारी, कर्मचारीही आघाडीवर होत्या.
*रत्नागिरी स्वच्छ सुंदर जिल्हा – जिल्हाधिकारी*
यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, अन्य जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी जिल्हा हा स्वच्छ आणि सुंदर आहे. इतर जिल्हयांमध्ये शासकीय कार्यालयातील कोपरे आणि भिंती रंगलेल्या पाहायला मिळतात. असा प्रकार इथे जवळपास नाही. जिल्हयाचे नागरिक देखील स्वच्छतेला महत्व देतात. जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांच्यासारखे अधिकारी आपल्या परिसराचे सुशोभिकरण करुन वेगळे अस्तित्व निर्माण करतात. इतर अधिकाऱ्यांनाही हे अनुकरणीय आहे.
महात्मा गांधीजींनी स्वच्छतेचे महत्त्व सांगितले आहे. यामध्ये सर्वांनीच सातत्य ठेवणे आवश्यक आहे. स्वच्छता ही निरंतर चालणारी गोष्ट आहे. स्वत:पासून स्वच्छतेची सुरुवात करायला हवी. पर्यायाने आपला परिसर आणि आपले शहर स्वच्छ बनेल.
पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालयाची स्वच्छता
स्वच्छता ही सेवा, स्वच्छता पंधरवडा आणि महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने आज कार्यालयांची स्वच्छता उपक्रमांतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालयाची स्वच्छता करण्यात आली. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी , अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसराची स्वच्छता केली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई, डीआरडीएच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी यांनी जिल्हा परिषद परिसर कार्यालयांची स्वच्छता केली.
पंचायत समिती रत्नागिरी, पंचायत समिती लांजा, पंचायत समिती चिपळूण, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी कर्मचाऱ्यांसह आपल्या कार्यालयाची स्वच्छता केली. चिपळूण वन विभागाने कार्यालयाची स्वच्छता केली. महावितरण नाचणे उपकेंद्र, मत्स्य विभाग, हार्बर डिव्हीजन, सार्वजनिक बांधकाम विभाग, राजापूर तहसील कार्यालय, खेड प्रांताधिकारी कार्यालय, राजापूर प्रांताधिकारी कार्यालय, दापोली प्रांताधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय दापोली, गुहागर तहसील कार्यालय, लांजा तहसील कार्यालय, मंडणगड तहसील कार्यालय, संगमेश्वर तहसील कार्यालय, खेड तहसील कार्यालय, रत्नागिरी तहसील कार्यालय आदी कार्यालयांमध्ये आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
आजच्या या स्वच्छता मोहिमेत रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर, त्यांचे सर्व स्वच्छता कर्मचारी, तहसीलदार हणमंत म्हेत्रे, तहसीलदार राजाराम म्हात्रे, स्वीय सहाय्यक तथा नायब तहसीलदार संदीप सावंत यांच्यासह महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button