
महाराष्ट्र साहित्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभेत झाली वादावादी
महाराष्ट्र साहित्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी गोंधळात पार पडली. समाजमाध्यमांवर परिषदेची बदनामी करणार्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी भाषणात सांगताच सभेत वाद निर्माण झाला.त्यातून काही सदस्यांमध्ये वादावादी आणि हमरीतुमरी झाली. मात्र, वेळीच काहींनी मध्यस्थी केल्यामुळे हा वाद शांत झाला. गोंधळातच सभेचा समारोप झाला. डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेची सभा माधवराव पटवर्धन सभागृहात झाली.
उपाध्यक्ष तानाजी चोरगे, राजीव बर्वे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते. कार्यकारिणीने पाच वर्षांच्या घेतलेल्या मुदतवाढीसह संस्थेची बदनामी करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या वक्तव्यावरून गोंधळ सुरू झाला. ‘आम्ही व्यक्त व्हायचेच नाही का?’ असा प्रश्न संस्थेचे सदस्य विजय शेंडगे आणि राजकुमार दुरगुडे पाटील यांनी उपस्थित केला. त्यावरून दोघांना सभागृहातील इतर सदस्यांनी विरोध केला. ‘मला बोलू द्या, मी उत्तर देतो,’ असे प्रा. जोशी या वेळी बोलत होते.
हा वाद बराच वेळ सुरूच होता. इतर सदस्य शेंडगे आणि दुरगुडे पाटील यांना ‘तुम्ही खाली, शांत बसा,’ असे सांगत होते. त्यातून शेंडगे, दुरगुडे-पाटील आणि काही सदस्यांमध्ये वादावादी वाढत गेली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सभागृहातील सदस्यांनी दोन्ही बाजूच्या लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप सुरूच राहिले. प्रा. जोशी यांचे भाषण गोंधळात संपले. त्यानंतर अध्यक्ष डॉ. कसबे बोलण्यासाठी उठले तेव्हा बोलू देण्याची मागणी शेंडगे यांनी केली. मात्र, अध्यक्ष बोलण्यासाठी उठले असल्याने आता बोलता येणार नाही, अशी भूमिका पदाधिकार्यांनी घेतली. ‘हीच का लोकशाही?’ असा सवाल शेंडगे यांनी केला.
www.konkantoday.com