
शिंदे-फडणवीस सरकारने दिला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांना हिरवा कंदील; रत्नागिरी जिल्ह्यासाठी 251 किमीच्या कामाला 207 कोटी
रत्नागिरी : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कामे जिल्ह्यात 2019 पासून रखडली होती. या कामांना शिंदे-फडणवीस सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे रत्नागिरीसह राज्यभरातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाला गती मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी 251 किमीच्या कामासाठी 207 कोटींना मंजुरी मिळाली आहे. पंतप्रधान सडक योजनेतील 265 किलोमीटरसाठी 200 कोटीला मंजुरी येत्या सहा दिवसात मिळेल. त्यामुळे जिल्ह्यात जवळपास सव्वाचारशे किलोमीटर चारशे कोटींचा निधी उपलब्ध होणार असल्याने रस्ते विकासाला गती मिळेल, असा विश्वास रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
मंडणगडमध्ये 12.5 किमीसाठी 9 कोटी, दापोलीत 26.25 किमीसाठी 10.50 कोटी, खेडमध्ये 29.63 किमीसाठी 19.50 कोटी, गुहागरमध्ये 21.84 किमीसाठी 16.50 कोटी, चिपळूण तालुक्यात 31.14 किमीसाठी 23.25 कोटी, संगमेश्वरमध्ये 37.24 किमीसाठी 25 कोटी, रत्नागिरी तालुक्यात 33.19 किमीसाठी 25 कोटी, लांजा तालुक्यात 25.51 किमीसाठी 18 कोटी आणि राजापूरसाठी 35.16 किमीसाठी 26.25 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाचा आराखडा तयार असून त्यातूनच ही कामे घेतली जाणार आहेत. निविदा प्रक्रिया झाल्यानंतर वर्षभरात ही कामे करायची असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेबाबत जिल्हा पातळीवर 16 नोव्हेंबर रोजी बैठक होणार आहे. या योजनेबाबत कमिट्याही मागील अडीच वर्षात झाल्या नव्हत्या. त्याबाबतही चर्चा होणार आहे. पंतप्रधान सडक योजनेच्या 265 किमी रस्त्याला या बैठकीत मंजुरी दिली जाणार आहे.




