कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर श्रीरंग कद्रेकर यांना यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक पुरस्कार जाहीर ________रत्नागिरी : दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर श्रीरंग कद्रेकर यांची यशवंतराव चव्हाण सेंटर आरोग्य दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सन 2023 च्या यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार सोहळा रविवार दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी १०.०० वा. ते दुपारी २.३० वाजता या वेळेत यशवंतराव चव्हाण मुंबई सेंटरच्या मुख्य सभागृहात सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
डॉक्टर कद्रेकर यांनी कोकण कृषी विद्यापीठांमध्ये सन 1987 ते 1993 अशी सलग सहा वर्षे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून आपली कारकीर्द यशस्वी केली. या कुलगुरू पदाच्या कारकिर्दीत तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शरद पवार यांनी महाराष्ट्र राज्यात सुरू केलेल्या रोजगार हमी योजनेशी निगडित फळझाड लागवडीसाठी कोकणातील शेतकऱ्यांना आंबा, काजू, कोकम, नारळ, चिकू, मसालाची पिके यांची लाखोंच्या पटीत दर्जेदार कलमे उपलब्ध करून दिली. परिणामी कोकणात फळझाड लागवड फलोत्पादन वाढण्याबरोबरच शेतकऱ्यांना रोजगार मिळून त्यांचा आर्थिक विकास तर झालाच शिवाय पुढील काळात कोकणात फळ प्रक्रिया उद्योगाचे नवे पर्व सुरू झाले. त्यांच्या अशा विविध क्षेत्रातील कार्यासाठी राष्ट्रीय, राज्यस्तरीय, विभागीय तसेच जिल्हा स्तरावर असंख्य मानाचे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
भारतीय पर्यावरण शास्त्र व तंत्रज्ञान संस्थेतर्फे आजही ते पर्यावरण जागृतीचे उपक्रम राबवित असून संगमेश्वर तालुक्यातील सांदीपनी गुरुकुलचे गेली 23 वर्षे अध्यक्ष म्हणून डॉ. कद्रेकर काम करत आहेत. तेथील गरीब, निराधार मुलांना शिक्षण आणि शेती उत्पादनातून रोजगार देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याचे काम त्यांनी केले आहे. रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सन 2008 ते सन 2018 अशी दहा वर्षे सांभाळताना शासनाच्या आर्थिक सहाय्यातून ज्येष्ठ नागरिक संघाची स्वतःची वास्तू उभारण्यात यश मिळविले. त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कोकण विभागीय केंद्र रत्नागिरी चे ते बारा वर्षे उपाध्यक्ष होते. त्या काळात त्यांनी कोकणातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचे विविध उपक्रम राबविले.
डॉक्टर कद्रेकर यांचे ‘लाल मातीत रंगलो मी’ हे आत्मकथन “कोकणच्या पाणी समस्या आणि उपाय” तसेच “आठवणी देश-विदेशातील भ्रमंतीच्या” या ललित लेखनाला वाचकांचा आणि अभ्यासकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्या या सर्वांगीण कार्याची दखल यशवंतराव चव्हाण सेंटरने घेऊन त्यांची यशवंतराव चव्हाण जेष्ठ नागरिक पुरस्कारासाठी निवड जाहीर केल्याने कोकणच्या वैभवामध्ये मानाचा तुला खोवला गेला आहे. त्यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
www.konkantoday.com