रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात पाचेरी आगर येथे गणपती विसर्जन मिरवणुकीत दुर्घटना, टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने दोन जणांचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात पाचेरी आगर येथे गणपती विसर्जन मिरवणुकीत दुर्घटना घडली आहे मिरवणुकीत असलेल्या टेम्पोचा ब्रेक फेल झालेले टेम्पो मिरवणुकीत घुसल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर अन्य लोक जखमी झाले आहेत
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात पाचेरी आगर येथे गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असताना दुर्दैवी अपघात झालाय. विसर्जन मिरवणुकीत टेम्पो घुसून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू तर १५ गणेशभक्त जखमी झाले आहेत. अपघातात १७ वर्षाची अल्पवयीन मुलगी व टेम्पो चालकाचा मृत्यू झालाय. विसर्जन मिरवणुकीत नाचणारे १५ भाविक जखमी झाले आहेत.कोमल नारायण भुवड (वय १७) आणि दीपक लक्ष्मण भुवड (वय ४८) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. अपघातात मृत्यू झालेले हे दोघेजण व जखमी झालेले गणेशभक्त हे सगळे पाचेरी आगर येथील भुवडवाडी येथे राहणारे आहेत.गुहागर तालुक्यात पाचेरी आगर येथे अनंत चतुर्दशीनिमित्त गणपती विसर्जन मिरवणूक सुरू होती. दुर्दैवाने विसर्जन मिरवणूक सुरू असताना टेम्पोचे ब्रेक फेल झाले आणि टेम्पो उताराच्या दिशेने पुढे जाऊ लागला. हा प्रकार टेम्पो ड्रायव्हरच्या लक्षात येताच त्यांनी टेम्पो मधून उडी मारून टेम्पो थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्या ड्रायव्हरच्या अंगावरून टेम्पो गेला. तसेच समोर नाचत असलेल्या भाविकांना या टेम्पोची जोरदार धडक बसली. या दुर्दैवी घटनेत टेम्पोमध्ये बसलेल्या १७ वर्षीय मुलीच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. यामधील जखमी झालेला चालक दीपक याला जवळच्या आबलोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक उपचाराकरिता त्याला डेरवण येथे नेण्यातयेत होते. मात्र वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.
www.konkantoday.com