मुंबई ते सिंधुदुर्ग या सहापदरी ग्रीनफिल्ड कोकण द्रुतगती मार्गाच्या कामासाठी १०० मीटर रूंद भूसंपादनाला राज्य शासनाची मान्यता


मुंबई ते सिंधुदुर्ग या सहापदरी ग्रीनफिल्ड कोकण द्रुतगती मार्गाच्या कामासाठी १०० मीटर रूंद भूसंपादनाला राज्य शासनाने मान्यता दिल्याने भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्यामुळे ३८८.४५ किलोमीटरच्या या महामार्ग उभारणीला वेग येणार आहे. हे काम चार टप्प्यात होणार असून हा महामार्ग नवी मुंबईल प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) या महामार्गासाठी अंमलबजावणी संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार एमएसआरडीसीने या महामार्गासाठी विविध पर्यायी आखणींचा अभ्यास करून चार टप्प्यातील अंतिम आखणी प्रस्ताव सादर केला आहे.

या महामार्गावर ताशी १०० किलोमीटर वेगाने प्रवास करता येणार आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणारा मुंबई ते सिंधुदुर्ग असा ग्रीनफिल्ड कोकण द्रुतगती मार्ग उभारण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला. हा महामार्ग नवी मुंबई येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळास जोडला जाणार असल्याने कोकणातून आंतरराष्ट्रीय प्रवास सोयीचा होणार आहे. या मार्गाची आखणी कोकणपट्टीच्या किनार्‍याजवळून करण्यात येणार असल्याने या मार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना कोकणचे निसर्ग सौंदर्य पाहता येणार आहे.
तत्कालीन नगरविकास मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १४ मार्च २०२० ला विधीमंडळात या संदर्भातील घोषणा केली होती. त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचा शासननिर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार प्रवेश नियंत्रित सहापदरी ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्ग बांधणे, १०० किमी प्रतितास वेगासाठी महामार्ग संकल्पित करणे, महामार्गासाठी १०० मीटर रूंद भूसंपादन करण्यास मान्यता देण्यात आले आहे.

रस्त्याचे बांधकाम चार टप्प्यात


पेण (बळवली गाव) ते रायगड, रत्नागिरी जिल्हा सीमा : ९५.४० किलोमीटर, रायगड-रत्नागिरी जिल्हा सीमा ते गुहागर-चिपळूण (रत्नागिरी जिल्हा) : ६९.४९ किलोमीटर, गुहागर-चिपळूण (रत्नागिरी जिल्हा) ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा सीमा : १२२.८१ किलोमीटर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा सीमा ते पत्रादेवी महाराष्ट्र-गोवा राज्य सीमा : १००.८४ किलोमीटर असे एकूण अंतर ३८८.४५ किलोमीटर असेल.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button