
ताडोबात दोन वाघांची जोरदार झुंज; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी!
नागपूर :* अधिवास आणि वाघिणीवरील हक्काच्या लढाईतून दोन वाघांमध्ये जोरदार झुंज झाली. या झुंजीत एक वाघ मृत्युमुखी पडला, तर एक वाघ गंभीर जखमी झाला. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील रामदेगी क्षेत्रात ही घटना घडली. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील रामदेगी क्षेत्र छोटा मटका, नयनतारा आदि वाघांमुळे पर्यटकांची पसंती ठरला आहे. नयनतारा ही वाघीण तीच्या निळ्या डोळ्यांमुळे अधिकच प्रसिद्ध आहे. तर गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्रात छोट्या मटक्याचे वास्तव्य आहे. त्यामुळे तो इतर वाघांना या एरियात येऊ देत नाही. इथे येणाऱ्या प्रत्येक नवीन वाघासोबत त्याची लढाई झाली आहे. या लढाईत बजरंग या वाघाला त्याने मारले आहे. तर मोगली या वाघाला देखील त्याने मारले आहे.या क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून वीरभद्र आणि ब्रम्हा हे दोन वाघ येत असून नयनतारा या वाघिणीसोबत त्यांचे मेटिंगसाठी प्रयत्न सुरू आहेत. काल सर्वत्र मचाण सेन्सस सुरू असताना रात्री साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास ब्रम्हा आणि छोटा मटका यांच्यात जोरदार लढाई झाली. दोन्ही वाघ एकमेकांवर धावून गेले आणि त्यांच्या आवाजाने परिसरात भीती पसरली. ही लढाई एवढी जोरदार होती की यात ब्रम्हा या वाघाचा मृत्यू झाला आणि छोटा मटका हा वाघ गंभीर जखमी झाला. छोटा मटका हा वाघ जेव्हा भद्रा या वाघाला मारून बाहेर आला तेव्हा त्याचे तोंड पूर्णपणे रक्ताने माखलेले होते. तर त्याचा पायदेखील गंभीर जखमी झाला होता. त्याला नीट चालताही येत नव्हते.सफारी आटोपून परतणाऱ्या पर्यटकांना हे दिसले. त्यांनी स्थानिक वन कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली. हे दिसताच स्थानिक वन कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना ही माहिती दिली. त्यावेळी तातडीने वरीष्ठ घटनास्थळी पोहचले. आज सकाळी या घटनेचा पंचनामा करण्यात आला. या लढाईत छोटा मटका या वाघाचा समोरचा पाय चिरला आहे. यापूर्वी देखील छोटा मटका गंभीर जखमी झाला आहे.