
रत्नागिरी जिल्हा भूमिअभिलेख विभागाकडून २८२ गावांमध्ये पुन्हा ड्रोन घेणार उड्डाण
रत्नागिरी जिल्हा भूमिअभिलेख विभागाकडून ५६४ गावांमधील २८२ गावांमध्ये पुन्हा एकदा ड्रोन सर्व्हे करण्यात येणार आहे. संबंधित गावांमध्ये वाड्या, वस्त्या विखुरलेल्या असल्याने रहिवासी वस्ती निश्चिती करणे कठीण होते. त्यामुळे आधी करण्यात आलेल्या ड्रोन सर्व्हेमध्ये अनेक गावांमधील गावठाण निश्चित करताना गावांमधील रहिवासी परिसर वगळला गेला. यामुळेच आता या गावांमध्ये पुन्हा एकदा ड्रोन उड्डाण करण्यात येणार असल्याचे भूमिअभिलेख विभागाकडून सांगण्यात आले.रत्नागिरी जिल्ह्यात ५६४ गावठाण आहेत. त्यापैकी रत्नागिरी तालुक्यात २३, लांजा येथे २, संगमेश्वर १५, चिपळूण तालुक्यात ८१, खेड तालुक्यात १६६, दापोलीमध्ये १३३ आणि मंडणगड तालुक्यात १०५ गावठाण आहेत. डिसेंबर २०२१ पासून रत्नागिरी तालुक्यात ही ड्रोन पाहणी सुरू झाली. त्यानुसार रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, खेड याठिकाणच्या गावठाणाची पहाणी करून या गावठाणांचे नकाशे तयार करण्यात आले आहेत. तयार झालेल्या नकाशांपैकी १७६ गावांमध्ये सनदांचे वाटप करण्यात आले असल्याचे जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाकडून सांगण्यात आले.www.konkantoday.com