कोकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्र लवकरच रत्नागिरी शहरात सुरू करण्यात येणार
कोकणातील कातळशिल्प आणि त्यांचा जागतिक वारसास्थळांच्या संभाव्य यादीतील समावेश हा प्रवास महत्त्वपूर्ण आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्र लवकरच रत्नागिरी शहरात सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रात संशोधन विभागासोबत कातळशिल्प विषयाबाबत सर्वांगीण माहिती उपलब्ध व्हावी, म्हणून प्रदर्शन आणि माहितीचे एक स्वतंत्र दालन असणार आहे.
कातळशिल्प शोधाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (भारत सरकार) यांच्या पुढाकाराने आयआयटीएम प्रवर्तक टेक्नॉलॉजी फाऊंडेशन, आयआयटी मद्रास आणि निसर्गयात्री संस्था द्वारा संचालित आयआयटी हैद्राबाद, जेएनयू दिल्ली यांच्या सहयोगाने संशोधन केंद्र उभे राहत आहे.
दक्षिण कोकणातल्या सड्यांवर शेकडोंच्या संख्येने आढळून येत असलेली ही कातळशिल्प अखंड मानवासाठी महत्त्वपूर्ण वारसा ठेवा आहे. युनेस्को जागतिक वारसा स्थळ संभाव्य यादीत स्थान मिळवलेली ही कातळशिल्प, त्यांचे आकार, पसारा आणि त्यामागील आशय विषय या बाबतीत जगाच्या पाठीवर वैशिष्टयपूर्ण आहेत. ही कातळशिल्प नक्की कोणत्या कालखंडात निर्माण केली? कोणी निर्माण केली? कशी निर्माण केली? त्या मानवाची त्यांची जीवनशैली कशी होती? अशा अनेक प्रश्नांची नक्की उत्तरे ज्ञात नाहीत. ही उत्तरे शोधण्यासाठी वरील संस्थांतर्फे प्रयत्न चालू आहेत. या प्रकल्पांतर्गत कोकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्र लवकरच सुरू करण्यात येत आहे. या केंद्राकरिता सुधीर (भाई) रिसबूड, धनंजय मराठे, ऋत्विज आपटे आणि टीम निसर्गयात्री मेहनत घेत आहेत.
www.konkantoday.com