आयुष्मान भव” मोहिमेतूनआरोग्य यंत्रणांमार्फत आठवड्याच्या दर शनिवारी ३२ प्रकारच्या आजारांची तपासणी मोफत
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व वयोगटातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी “आयुष्मान भव” मोहीम हाती घेण्यात आली आहे.यामध्ये गावपातळीवरील आरोग्य यंत्रणांमार्फत आठवड्याच्या दर शनिवारी ३२ प्रकारच्या आजारांची तपासणी मोफत करण्यात येणार आहे. याचा सर्व लाभार्थानी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.
जन सामान्यांना एकाच छताखाली आरोग्य सेवा देण्यासाठी देशभरात ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ”आयुष्मान भव” मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत ”आबाल वृद्धां”च्या ३२ प्रकारच्या आरोग्य तपासण्या व मोफत उपचार केले जात आहेत. आयुष्यमान भारत, आभा कार्डसह विविध आरोग्यसेवा देण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी सांगितले. ”आयुष्मान भव” मोहिमेतून प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या माध्यमातून अगदी घरापर्यंत जाऊन लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाची आरोग्याची तपासणी मोफत करण्यात येत आहे. या सोबत आरोग्यसंस्थांची स्वच्छता, रक्तदान शिबिरे व अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. आयुष्मान आपल्या दारी ३.० उपक्रमांतर्गत पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून आयुष्मान कार्ड वाटप करण्यात येत आहे तसेच आयुष्मान सभा घेऊन गावपातळीवर प्राथमिक आरोग्यकेंद्रामार्फत असंसर्गजन्य रोग, सिकलसेल, लसीकरण व क्षयरोग आदींबाबत जनजागृती करण्यात येत आहे. गावपातळीवर प्राथमिक आरोग्यकेंद्र, उपकेंद्रांतर्गत गावातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी ४ आठवड्याचा कार्यक्रम आखण्यात आला असून, प्राथमिक आरोग्यकेंद्राकडून आठवड्याच्या दर शनिवारी ३२ प्रकारच्या आजारांची तपासणी मोफत केली जात आहे.
www.konkantoday.com