स्मार्ट मीटरमुळे सुमारे १० हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीचे विघ्न
वीज ग्राहकांकडे आता ‘स्मार्ट प्रिपेड मीटर’ लागणार आहे. हे काम अदानींसह एकूण चार खासगी कंपन्यांना देण्यात आले आहे. या मीटरमुळे मीटर रिडिंग, देयक वाटप ही कामे बंद होणार असल्याने ऐन गणेशोत्सवाच्या काळात सुमारे १० हजार कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीचे विघ्न आले आहे.महावितरणने स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्याचे कंत्राट मे. अदानी, मे. एनसीसी, मे. मॉन्टेकार्लो, मे. जीनस या चार कंपन्यांकडे दिले आहे. करारातील अटीनुसार स्मार्ट मीटर लावल्यापासून दहा वर्षे संबंधित कंपनीलाच मीटरचा डेटा घेणे, यंत्रणा विकसित करणे, मनुष्यबळ लावणे, मीटरमध्ये दोष उद्भवल्यास बदलून देण्याची जबाबदारी पार पाडायची आहे.आधी ही कामे कंत्राटदाराच्या माध्यमातून व्हायची. या कंत्राटदारांनी सुमारे १० ते १२ हजार कामगारांना यासाठी रोजगार दिला. परंतु स्मार्ट मीटरमुळे आता हे सर्वच कर्मचारी बेरोजगार होणार आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात जास्तीत जास्त रोजगार देण्याची गोष्ट करतात तर दुसरीकडे आम्हाला बेरोजगार केले जात आहे, असा आरोपही कंत्राटी कामगारांनी केला आहे.
www.konkantoday.com