
रत्नागिरी- शहर परिसरात ढोल-ताशा, बेंजोच्या तालावर बाप्पाला निरोप
रत्नागिरी, ता. २३ : ढोल-ताशांच्या आणि बेंजोच्या तालावर बाप्पा मोरयाचा गजर करत शनिवारी (ता.२३) सायंकाळी गौरी-गणपतींना निरोप देण्यात आला. पावसाने घेतलेली विश्रांती भक्तांच्या पथ्यावर पडली. त्यामुळे मोठ्या मिरवणुका काढून आणि गुलालाची उधळण करत बाप्पाला समुद्र, नदी, तलावाकाठी भक्तीभावाने निरोप दिला. संध्याकाळी चारनंतर सुरू झालेल्या मिरवणुका पाच ते सहा तास सुरू होत्या. रात्री उशिरा विसर्जनानंतर मुंबईकर चाकरमानी पुन्हा मुंबईला परतू लागले.
जिल्ह्यात काल एक लाख १५ हजार २३४ घरगुती, तर १७ सार्वजनिक गणपतींचे विसर्जन केले. विसर्जनस्थळी पोलिसांचा कडक बंदोस्त होता. मांडवी किनाऱ्यावर नगरपालिकेतर्फे निर्माल्य संकलन करण्यात येत होते. त्याला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू असल्याने या ठिकाणी भाविकांनी निर्माल्य दिले. साधारण तीन ते चार ट्रक भरून निर्माल्य संकलित झाले होते. मंडणगड येथे दुपारनंतर रिमझिम पावसाने हजेरी लावली. या पावसातच बाप्पांना निरोप देण्यात आला.
सवाद्य मिरवणुकांनी बाप्पाला निरोप देताना अनेक भक्त भावूक झाले.
किनाऱ्यावर आरती करून विसर्जन करण्यासाठी भाविकांची लगबग सुरू होती. बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जाणारे कार्यकर्ते मांडवीत कार्यरत होते. तसेच पोलिसांनीही नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतली.
,www.konkantoday.com