घाणेकुंजमधील युवकाला अपघातामुळे अपंगत्व, युवकाला रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने नवीन व्हिलचेअर दिली
रत्नागिरी, ता. २२ : खेडमधील लोटे घाणेकुंजमधील युवकाला अपघातामुळे अपंगत्व आले. या युवकाला रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने नवीन व्हिलचेअर दिली आहे. सतत बिछान्यावर राहून कंटाळलेल्या सादाबच्या चेहर्यावर व्हीलचेअरवर बसल्यानंतर आनंद दिसत होता.
सादाब सुलेमान पटेल (वय २०, मु. पो. लोटे घाणेकुंज ता. खेड) असे या युवकाचे नाव आहे. बारावीपर्यंत शिक्षणानंतर तो लोटे येथील केमिकल कंपनीत कामाला लागला. मोठा भाऊ दुसर्या कंपनीत नोकरीला आहे. वडील मटण शॉपमध्ये असून आई गृहिणी आहे. या सुखी कुटुंबात गेल्या महिन्यात विघ्न आले. सादाब मित्रांसोबत कारने जेवायला निघाला होता मात्र कारचा अपघात झाला आणि सादाबच्या मणक्याला मार लागला. त्याला डेरवणच्या वालावलकर हॉस्पीटलला दाखल केले. मणक्याचे ऑपरेशन झाले. पण कमरेपासून खालील भागाच्या संवेदना गेल्याने तो पॅराप्लेजीक झाला. एक महिना हॉस्पीटलमध्ये राहावे लागले. त्याला सर्व विधी बेडवर करावे लागत आहेत.
सादाबच्या वडिलांना पोसरे गावचे सामाजिक कार्यकर्ता बरकत खेरटकर यांच्याकडून रत्नागिरी हॅडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशन (आरएचपी) या संस्थेविषयी माहिती मिळाली. त्यांनी फाउंडेशनशी संपर्क साधून सादाबविषयी सर्व माहिती सांगितली. त्यांना सादाबसाठी व्हीलचेअर हवी होती. जेणेकरुन सादाबला दवाखान्यात ने आण करणे, घरातल्या घरात फिरण्यासाठी मदत होईल. आरएचपी फाउंडेशनचे संस्थेचे सदस्य समीर नाकाडे, प्रिया बेर्डे यांनी सादाबची सर्व माहिती घेऊन संस्थेतर्फे नवीन व्हीलचेअर दिली. व्हीलचेअर प्रदान करताना सादाबचे वडील सुलेमान, आई शेरबानु, मामा शाईद बशीर चौगुले, कुमार राठोड उपस्थित होते.
आता सादाब दररोज दोन तास व्हिलचेअरवर बसतो. व्हीलचेअर चालवताना त्याच्या हाताची हालचाल होते. हातातली ताकद वाढली तरच तो पुढील आयुष्य हाताच्या जोरावर बेडवर, कमोड, गाडीत, रिक्षात, शिफ्ट होऊन सुसह्य करु शकतो. सादाबला पॅराप्लेजीक पेशंटनी स्वत:ची काळजी कशी घ्यावी, पोट साफ कसे करावे, बेडसोअर होऊ नये, यासाठी कशी काळजी घ्यायची, याविषयी सर्व माहिती संस्थेचे अध्यक्ष सादीक नाकाडे यांनी दिली.
www.konkantoday.com