संसदेच्या पाच दिवसीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात
संसदेच्या पाच दिवसीय अधिवेशनाला आजपासून (18 सप्टेंबर) सुरुवात होत आहे. सरकारने याची घोषणा करताना हे ‘विशेष अधिवेशन’ असल्याचं म्हटलं होतं.परंतु नियमित अधिवेशन असल्याचं नंतर स्पष्ट करण्यात आलं. हे अधिवेशन सध्याच्या लोकसभेचं तेरावं आणि राज्यसभेचं 261 वं अधिवेशन असल्याचं म्हटलं. हे अधिवेश 22 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. यादरम्यान सभागृहाचं कामकाज सकाळी 11 ते दुपारी 1 मग दुपारी 2 ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहिल. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज राज्यसभेत 75 वर्षांचा संसदीय प्रवास, कामगिरी, अनुभव, आठवणी यावर चर्चा होणार आहे. पोस्ट ऑफिस विधेयक 2023 आणि मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित विधेयके राज्यसभेत मांडली जातील. ही दोन्ही विधेयके राज्यसभेत मांडल्यानंतर लोकसभेत मांडली जातील. लोकसभेत अॅडव्होकेट्स अमेंडमेंट बिल 2023 आणि प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पीरियडिकल बिल 2023 सादर केले जातील. ही विधेयके 3 ऑगस्ट रोजी राज्यसभेत मंजूर झाली आहेत.
याशिवाय संसदेच्या अधिवेशनादरम्यान, G20 शिखर परिषदेचं यश, चंद्रावर चांद्रयान-3 चं सॉफ्ट लँडिंग आणि स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दलही चर्चा होऊ शकते. ‘वन नेशन वन इलेक्शन’ आणि देशाचे नाव ‘इंडिया’ वरुन ‘भारत’ करण्याचा प्रस्तावही या अधिवेशनात आणला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
www.konkantoday.com